
सामना प्रतिनिधी, कर्जत
ज्येष्ठ साहित्यिक, ‘लोकराज्य’ मासिकाचे माजी संपादक व चित्रपट समीक्षक दिवाकर गंधे यांचे आज डोंबिवलीतील खासगी रुग्णालयात निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. रेडिओ, दूरचित्रवाणीबरोबरच मुलाखतीच्या क्षेत्रातही त्यांनी भरीव कामगिरी केली होती. त्यांच्या निधनाने साहित्य आणि कला या प्रांतात मुशाफिरी करणारा लेखक हरपल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून दिवाकर गंधे यांना किडनीचा त्रास होता. त्यामुळे त्यांना डोंबिवलीतील न्यू लाइफ रुग्णालयात दाखल केले होते. तीन महिने ते दवाखान्यातच होते. अखेर आज त्यांचे निधन झाले. मूळचे जळगावचे असलेले गंधे यांची कारकीर्द शिक्षण क्षेत्रापासून सुरू झाली. राज्य सरकारच्या माहिती व जनसंपर्क विभागात संचालक म्हणून ते निवृत्त झाले होते. विशेषतः ‘लोकराज्य’ या मासिकाला खऱ्या अर्थाने लोकमान्यता मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांचे पारिजात, हुसेनचा घोडा हे कथासंग्रह तर कादंबरीही प्रसिद्ध आहे.
गंधे यांनी वर्तमानपत्रे, मासिकांमध्ये चित्रपट तसेच संगीतावर विपुल लेखन केले. शास्त्रीय संगीताचीही त्यांना चांगली जाण होती. ललित शैलीतील त्यांच्या लेखनाबद्दल रेडिओ सिलोनने त्यांचा विशेष गौरव केला होता. आज रात्री गंधे यांच्या पार्थिवावर नेरळमधील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.






























































