मलखांबातून फिटनेस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अक्षय तरळ, मलखांबपटू

फिटनेस म्हणजे – शरीराला दिलेली हालचाल आणि आजारापासून लांब राहणे म्हणजे मी फिटनेस मानतो.

मलखांब की आरोग्य – पहिलं प्राधान्य मलखांबला. रोज मलखांब होत असल्याने माझा नियमित फिटनेस होतो. जर मी फिट आहे तर माझे आरोग्य आहे. म्हणून पहिलं प्राधान्य मलखांबला.

डाएट की जीवनशैली- जर आपलं डाएट चांगलं असेल, आपल्या शरीराला जे काही योग्य घटक लागतात, ते सगळे आपल्या शरीराला नीट मिळत असतील आणि ते गरजेनुसार मिळत असतील तर आपली जीवनशैली चांगलीच होईल.

सामान्य माणसासाठी फिटनेस – दिवसातला काही वेळ स्वतःसाठी देणं त्यावर त्या माणसाचा फिटनेस अवलंबून असतो. किमान स्वतःसाठी एक तास काढायला हवा. घरबसल्या योगा, सूर्यनमस्कार करु शकता, त्यासाठी बाहेर जाऊनच व्यायाम करायला हवा असे नाही.

मलखांब म्हणजे दिसणं, आरोग्य की स्पर्धा – मलखांबला दिसणंही बोलू शकता, आरोग्यही बोलू शकता आणि स्पर्धात्मकही बोलू शकता. ते समोरच्या व्यक्तीवर अवलंबून आहे की तो मलखांबला कसा घेतो. आम्ही स्पर्धात्मक मलखांब खेळतो. काहीजण आरोग्यासाठी खेळतात. मलखांब हा असा खेळ आहे, ज्यामध्ये पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत त्या व्यक्तीचा व्यायाम होतो. मलखांबमध्ये पूर्ण शरीराचा व्यायाम असल्यामुळे दुसऱया गोष्टींची वेगळी गरज लागत नाही. मलखांब हा तिन्ही रुपात बघितला जाऊ शकतो.

दिवसातून पाणी किती प्यावे- किमान तीन लिटर पाणी आपल्या शरीरात जायला हवे. माझं तीन लीटरपेक्षा जास्त पाणी होतं. शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रणात असेल तर आपल्याला पित्ताचे आजार कमी होतील.

व्यायामाला किती वेळ देता? – माझ्या दिवसाची सुरुवात आणि दिवसाचा शेवट व्यायामाने होतो. सकाळचा एक तास फिटनेससाठी देतो आणि संध्याकाळचे दोन तास मलखांबच्या सरावासाठी देतो.

जिमला जायला न मिळाल्यास काय करता? – तशी वेळच येत नाही. जिमला गेल्याशिवाय मी राहू शकत नाही. पण एखाद्या दिवशी जायला नाहीच जमले तर घरच्या घरी व्यायाम करतो.
बाहेर गेल्यावर डाएट कसा सांभाळता? – बाहेर गेल्यावर मला जे आवडतं ते मी खातो. माझा डाएट प्लॅन वगैरे अजिबात नाही. आपण जे खातो ते बर्न करता आले पाहिजे. मी एवढे खाल्ले ना तर माझा एवढा फिटनेस व्हायला हवा. असे जर तुम्ही ठरवाल तर तुम्ही बिनधास्त खाऊ शकता.

कोणता पदार्थ नियमित खाता? – दूध, चार अंडी.

फिटनेससाठी कोणत्या गोष्टीचा त्याग केलाय? – काहीच त्याग केलेला नाही. ज्यांना फिटनेस राखायचा असेल तर काही त्याग करायचे नाही. पण जे खातो ते बर्न करता आले पाहिजे.
फिटनेसबाबत अपडेट करण्यासाठी? – माझ्या शरीराचा एक व्यायाम ठरलेला असतो तो व्यायाम माझे गुरु ठरवतात. स्पर्धेला जायचे असेल तर स्पर्धेच्या अगोदरचा व्यायाम काय केला पाहिजे किंवा जास्त व्यायाम करुनही शरीराला इजा होते. अशावेळी ती टाळण्यासाठी मग त्यासाठी काय वेगळा व्यायाम असतो. हे सगळं मी माझ्या गुरुंच्या मार्गदर्शनाखाली केले जाते. बाकी मी काही करत नाही. जे गुरु सांगतील तेच करतो.

फिटनेस मंत्र – सध्या तरुणांमध्ये सिक्स पॅकचे वेड आहे. त्यांना कमी वेळात जास्त फिटनेस करायचा असतो. फिटनेसला आव्हान न घेता जो व्यायाम तुमच्या शरिराला योग्य आहे तोच व्यायाम प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली करावा. अनेकांचे काम बैठे असल्याने स्थूलता वाढते आणि त्यांना पाठीचे आजार होतात. त्यासाठी सूर्यनमस्कार, योगा केल्यास उत्तम. एकाजागी बसून न राहता शरीर कार्यान्वित ठेवावे.