लाचखोर अधिकारी बनला अतिरिक्त आयुक्त, आयुक्त बोडके यांची किमया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, कल्याण

आधी ‘सुट्टी’ प्रकरण मग संजय घरत प्रकरणी राज्य शासनाने झापल्यानंतरही कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्तांचे वादग्रस्त निर्णय काही कमी होताना दिसत नाहीत. लाचप्रकरणी एसीबीच्या जाळ्यात अडकून पुन्हा सेवेत आलेल्या उपायुक्त सु. रा. पवार या वादग्रस्त अधिकाऱ्याला थेट अतिरिक्त आयुक्तपदी बसवण्याची किमया बोडके यांनी केली आहे. आज त्यांनी याबाबतचा आदेश काढल्यानंतर नगरसेवकांसह अधिकारी – कर्मचारीही चक्रावून गेले.

आचारसंहिता कधीही लागण्याची शक्यता असताना आयुक्त गोविंद बोडके विकासकामांच्या 550 फाईलवर सही न करता अचानक सुट्टीवर गेले होते. याच दरम्यान नगरविकास खात्याने बोडके यांना चांगलेच झापले आहे. लाचखोर अतिरिक्त आयुक्त संजय घरत याच्याविरुद्ध विशेष न्यायालयात अभियोग दाखल करावा का, याबाबतची विचारणा शासनाकडे केली होती. यावर नगरविकास खात्याने बोडके यांना चांगलेच झापले आहे. संजय घरत शासनाने प्रतिनियुक्तीवर पाठवलेला अधिकारी नसून ते पालिकेच्या आस्थापनेवर आहेत. त्यामुळे महासभेने केलेल्या ठरावाची अंमलबजावणी करण्याचे आदेश नगरविकास खात्याने दिले आहेत. हे कमी म्हणून की काय आज बोडके यांनी उपायुक्त सु. रा. पवार यांना थेट अतिरिक्त आयुक्तपदाचा पदभार दिला.

ढीगभर तक्रारी तरीही…
मुळात पवार यांच्याविषयी शासनाकडे ढीगभर तक्रारी आहेत. याआधी ते लाच घेताना रंगेहाथ पकडले गेले होते. त्यामुळे त्यांच्याकडे जबाबदारीची खाती देऊ नयेत, अशी सर्वपक्षीय नगरसेवकांनी आयुक्तांकडे मागणी केली केली होती. तरीही बोडके यांनी पवार यांना थेट अतिरिक्त आयुक्त करण्याची किमया केली.