चौपदरीकरणाच्या कामात अडकलेल्या मगरीला वनखाते व सिस्केपकडून जीवदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । अलिबाग

मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामांमध्ये मोहोप्रे गावचे हद्दीत गांधारी पुलानजिक सुरू असलेल्या नवीन पुलाच्या कामातील खड्डयामध्ये मगर अडकली होती. या मगरीला वन खात्याचे अधिकारी व महाड येथील सिस्केप संस्थेच्या सदस्यांनी सुरक्षितरित्या बाहेर काढून तिला हिंदू स्मशानभूमीनजीक घाटावरून सावित्री नदीत सोडून जीवदान दिले आहे.

महाडच्या बाजूने वाहणाऱ्या सावित्री व गांधारी नदीमध्ये मोठ्या संख्येने मगरींचे वास्तव्य असून गांधारी नदीतील एक साडेसात फुटीमगर मोहोप्रे गावचे हद्दीत चौपदरीकरणाचे कामात सुरु असलेल्या नवीन पुलाचे कामातील खड्डयात जाऊन अडकली होती. एल अॅन्ड टीच्या इंजिनिअरने ही अडकलेली मगर आज पाहताच वन खात्याचे अधिकारी शिंदे यांच्याशी संपर्क साधला. वनक्षेत्रपाल शिंदे यांनी महाडमधील सिस्केप संस्थेच्या सदस्यांशी संपर्क साधून आज दुपारी एकत्रितरित्या खड्ड्यात अडकलेल्या मगरीला सुरक्षितरित्या बाहेर काढून तिला हिंदू स्मशानभूमी जवळील घाटावरून सावित्री नदीत सोडण्यात आले.

याकामी सिस्केपचे योगेश गुरव, मीत डाखवे, प्रणव कुलकर्णी, अक्षय भाटे, ओम शिंदे, नितीन कदम, ओमकार वारणकर, वनरक्षक पि डी जाधव, प्रकाश पवार, गाडीवान सुधीर शेडगे यांनी मोलाची कामगिरी बजावली.