
सामना प्रतिनिधी। मुंबई
भारिप-बहुजन महासंघाचे नेते आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेची निवडणूक त्यांच्या पारंपरिक अकोला मतदारसंघाऐवजी सोलापूरमधून लढवण्याची घोषणा केली आहे.
सध्या तो मतदारसंघ भाजपच्या ताब्यात असून शरद बनसोडे हे विद्यमान खासदार आहेत. मागील वेळी मोदी लाटेतून त्यांच्याकडून पराभूत झालेले ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनाच काँग्रेस निवडणूक रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांची उमेदवारी ही शिंदे यांच्यासाठी घातक ठरण्याची शक्यता आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आपण आज तरी सोलापुरातून लढण्यावर ठाम आहे. उद्याचे काही सांगता येत नाही, असे पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे ते सोलापूर आणि अकोला या दोन्ही जागांवर लढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





























































