
सामना ऑनलाईन । मुंबई
सगळीकडे लग्नसराईचा मोसम सुरू असताना सोन्याच्या किमतीत घट झाल्याचे वृत्त आहे. सराफ बाजारात 34 हजार रुपयांचा आकडा गाठणाऱ्या सोन्याच्या किमतीत घट झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात रुपया वधारल्यामुळे सोन्याच्या किमतीत फरक पडल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे शेअर बाजारात आलेल्या तेजीनंतर गुंतवणूकदार सोन्यातील गुंतवणूक कमी केल्यानेही हा परिणाम दिसत असल्याचंही बोललं जात आहे.
20 फेब्रुवारी रोजी सराफ बाजारात सोन्याची किंमत 34,975 प्रतिततोळा इतकी होती. त्यानंतर मार्च महिन्यात 34 ते 33 हजारांच्या दरम्यान आकडा कमी जास्त होत होता. मात्र, आता सोन्याची किंमत जवळापास दीड हजारांनी घटली असून 32,500 रुपये प्रतितोळा झाली आहे. त्यामुळे ऐन लग्नसराईत खरेदीला उधाण येण्याची शक्यता आहे. या किमती अजूनही घटण्याची शक्यता आहे.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, स्थानिक सराफांकडून सोन्याची मागणी घटली आहे. तसंच डॉलरची किंमतही इतर चलनांच्या तुलनेने घसरत आहे. त्यामुळे ही घट पाहायला मिळत आहे. पुढील काही दिवसांमध्ये या किमतीत अजून घट होईल, असा अंदाजही शेअर तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.


























































