पुलांप्रमाणे रेल्वे वसाहतीही खंगल्या; छताचा भाग कोसळून एकजण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

एकीकडे रेल्वेच्या आणि पालिकेच्या हद्दीच्या वादात सामान्यांचे जगणेही होत्याचे नव्हते होत असताना आता खुद्द रेल्वेच्या दिव्याखाली किती अंधार आहे याचे प्रत्यंतर पुन्हा एकदा आले आहे. मंगळवारी हार्बर मार्गावरील गुरू तेग बहादूर नगर स्थानकाला खेटूनच असलेल्या जीटीबी रेल्वे क्वॉर्टर्सच्या एका घराच्या छताचे बांधकाम कोसळून रेल्वे कर्मचाऱयांचे आप्तच जखमी झाले. थोडक्यात निभावले म्हणून, अन्यथा जिवावर बेतण्यासारखा हा प्रकार होता.

जीटीबी रेल्वे वसाहतीच्या 8 बाय 24 सी-विंग 33 क्रमांकाच्या घराचे छत सकाळी कोसळून अमित तुळवे (27) जखमी झाले असून त्यांच्यावर शीव रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले. या गंभीर घटनेनंतरही सायंकाळी उशिरापर्यंत रेल्वेचा कोणताही जबाबदार अधिकारी घटनास्थळी आला नसल्याचे अमित यांनी सांगितले. यासंदर्भात तीन वेळा इंजिनीयरिंग विभागाचे आयओडब्ल्यू विभागाचे अधिकारी प्रकाश यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती.

बरेवाईट झाल्यास जबाबदारी कोणाची?

काही दिवसांपूर्वीच त्यांच्या शेजारच्या 24 क्रमांकाच्या घरामध्ये तर थेट बेडवरच छत कोसळले असल्याची विदारक आँखोदेखी अमित यांनी सांगितली. रेल्वेच्या इंजिनीयरिंग विभागातील अधिकारी थातूरमातूर रंगरंगोटी करून वेळ मारून नेण्यात धन्यता मानत आहेत. यात एखाद्याचा जीव गेला तर जबाबदार कोण, असा सवालही त्यांनी यावेळी केला. ‘पदाधिकाऱयांना एक न्याय, तर आम्हाला दुसरा न्याय’ हा रेल्वेचा प्रशासकीय खाक्या असल्यामुळे जगणे कठीण झाल्याची सार्वत्रिक प्रतिक्रिया वसाहतीत आहे.

जीव मुठीत घेऊन रेल्वे कर्मचारी जगत आहेत

खंगलेल्या इमारती, गळक्या भिंती, एखाद्या पडीक जागेत शिरावे असे भीतीदायक वातावरण, गळतीने विटलेले रंग, भिंतीवर आलेले पोपडे, त्यातून डोकावणाऱ्या लोखंडी सळय़ा हे वर्णन कोणत्याही कामगार वस्त्यांना फिट बसते. रेल्वे कर्मचारीही त्यास पारखे नाहीत. जीटीबी रेल्वे वसाहतही अशीच तळघरात शिरल्याप्रमाणे भुयारात आहे. सतत पाणी साचल्याने होणारा डासांचा प्रादुर्भाव, भटक्या कुत्र्यांचा बिनधास्त वावर आदी समस्यांनी येथील रेल्वे कर्मचारी जीव मुठीत घेऊन जगत आहेत.