
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
हरयाणाची प्रसिद्ध गायक व नृत्यांगणा सपना चौधरी ही येत्या 30 मार्चला भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी दिले आहेत. तिवारी यांनी येत्या 30 मार्चला सपनाच्या बाबतीत महत्त्वाची घोषणा करणार असल्याचे आज पत्रकारांना सांगितले. त्यावरून आता वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.
गेल्या आठवड्यात सपना चौधरीने काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याचे काँग्रेसने जाहीर केले होते. मात्र दुसऱ्याच दिवशी सपनाने पत्रकार परिषद घेऊन तिने काँग्रेसमध्ये प्रवेश केला नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच त्यावेळी तिने ती भाजपचे नेते मनोज तिवारी यांच्या संपर्कात असल्याचे देखील सांगितले होते. त्यानंतर काँग्रेसने देखील सपनाचा सदस्यत्वाचा अर्ज जाहीर करत सपना खोटं बोलत असल्याचा आरोप केला होता.































































