निवडणूक प्रशिक्षणाला 323 कर्मचाऱ्यांची दांडी, कारवाईचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

लोकसभा निवडणुकीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ३० आणि ३१ मार्च रोजी आयेजित करण्यात आलेल्या प्रशिक्षणाला रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल ३२३ कर्मचाऱ्यांनी दांडी मारल्याची माहिती उघडकीस आली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. समाधानकारक कारण न मिळाल्यास अशा कर्मचाऱ्यांवर लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ चे कलम १३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिला आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्राध्यक्ष, सहाय्यक मतदान केंद्राध्यक्ष, इतर मतदान अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्या कर्मचाऱ्यांसाठी ३० आणि ३१ मार्च रोजी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणाला रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल ३२३ कर्मचाऱ्यांनी दांडी मारली. त्यामध्ये दापोलीतील ९७, गुहागरातील १०, चिपळूणमधील २४, रत्नागिरीतील १६६, राजापूरातील २६ कर्मचाऱ्यांनी दांडी मारली. दांडी बहाद्दर कर्मचाऱ्यांकडून ४८ तासात खुलासे मागितले आहेत. वैद्यकीय कारण देणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत वैद्यकीय मंडळाचे मत घेतले जाणार असल्याने दांडी बहाद्दर कर्मचारी अडचणीत सापडले आहेत. कारण कर्मचाऱ्यांचे कारण योग्य आहे की नाही याची पडताळणी स्वत: जिल्हाधिकारी सुनील चव्हाण घेणार आहेत.