
सामना ऑनलाईन । मुंबई
आचारसंहितेचा धाक दाखवून लातूर जिह्यातील उदगीरच्या सराफाला दीड लाख रुपयांचा चुना लावणाऱ्या चौघा पोलीस कर्मचाऱ्याना अटक करण्यात आली असून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे, अशी माहिती कायदा व सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारांबे यांनी दिली. सराफा व्यापारी सचिन चन्नावार यांनी या प्रकरणी लातूरच्या पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली होती. सोमवारी रात्री उशिरा घरी जात असताना त्यांच्याकडे 6 लाख रुपयांची रोकड होती. त्यावेळी चार पोलीस कर्मचाऱ्यानी त्यांना अडवले आणि पैशांबाबत चौकशी केली. त्यानंतर आचारसंहितेचा धाक दाखवून त्यांच्याकडून दीड लाख रुपये काढून घेतले. पोलीस शिपाई श्रीहरी डावरगवे, श्याम बडे, महेश खेळगे आणि रमेश बिर्ले यांच्यावर 392, 384 आणि 34 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षकांनी या चौघा पोलीस शिपायांना अटक करून त्यांना सेवेतून बडतर्फ करून टाकले.




























































