
सामना प्रतिनिधी । नांदेड
गेल्या आठवडाभरापासून उष्णतेच्या लाटेत त्रस्त असलेल्या नांदेडकरांना आज निसर्गाने थोडा दिलासा दिला. आज सकाळपासून दुपारी एक वाजेपर्यंत शहर व जिल्ह्याच्या अनेक परिसरात ढगाळ वातावरण होते तर अर्धापूर आणि हिमायतनगर परिसरात हलका ते मध्यम पाऊस झाला आहे.
गेली आठ दिवस झाले नांदेडचे तापमान सतत वाढते असून, ४३ अंशापर्यंत उष्णतेचा पारा पोहंचल्याने नांदेडकर त्रस्त होते. दुपारच्या वेळेस तर रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत होता. वेगवेगळ्या राजकीय पक्षांना देखील याचा जबर फटका बसला. त्यामुळे दुपारी होणाऱ्या बैठक अनेकांना पुढे ढकलाव्या लागल्या. सबंध राज्यात उष्णतेची लाट असल्याचा हवामान खात्याचा निर्वाळा त्यामुळे नांदेडकरांनी अगोदरच स्वतःची काळजी घेतली आहे. गेल्या तीन दिवसात तर तापमानाने चांगलाच कहर करुन हे तापमान ४३ अंशापर्यंत पोहंचले होते. मात्र आज सकाळी नांदेडकरांना ढगाळ वातावरणामुळे चांगलाच दिलासा मिळाला. दुपारी एक वाजेपर्यंत शहराचे तापमान ३६ अंशापर्यंत खाली उतरले होते. मात्र हवेतील दमटपणा व गरमी कायम आहे. याच दरम्यान आज सकाळी अर्धापूर परिसर आणि हिमायतनगर परिसरात हलका ते मध्यम पाऊस झाल्याने उकाड्यापासून हैराण झालेल्या ग्रामस्थांना चांगलाच दिलासा मिळाला. वातावरणातील या बदलामुळे गहू पिकावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.




























































