
सामना ऑनलाईन । चंद्रपूर
चंद्रपूर लोकसभेची निवडणूक दारूच्या पेल्याभोवती फिरतेय याची जाणीव झालेले मतदार ‘आम्हाला दारूविक्या खासदार नको’ अशी मागणी करू लागले आहेत. चंद्रपूरचे काँग्रेस उमेदवार बाळू धानोरकर यांचा दारूविक्रीचा व्यवसाय असल्याचे समजल्यानंतर चंद्रपूर-यवतमाळमधील दारूबंदी आंदोलक आणि दारूबंदीसाठी आग्रही मतदार कमालीचे संतप्त झाले आहेत. त्यांनी धानोरकरविरोधात भाजपला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले आहे.
काँग्रेसने एका दारू विक्रेत्याला उमेदवारी दिल्याने चंद्रपूर-यवतमाळ जिह्यातील मतदार नाराज आहेत. श्रमिक एल्गार, तुकडोजी महाराज दारूमुक्ती आंदोलन, स्वामीनी दारूमुक्ती अभियान या संघटनांनी थेट भाजपला पाठिंबा दिला आहे. चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली या दारूबंदी असलेल्या तीन जिह्यांसंदर्भात कायदे अधिक कडक करणे आणि यवतमाळच्या दारूबंदीसंदर्भात निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली समिती नेमण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने ही भूमिका घेतली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, दारूविक्री हा आपला वैध व्यवसाय असून माझे केवळ एकच दुकान आहे, असा दावा धानोरकर यांनी केल्याने मतदार आणखीनच संताप व्यक्त करत आहेत.

































































