
सामना प्रतिनिधी। मुंबई
अभिनेत्री आणि काँग्रेसचे उत्तर मुंबई तील लोकसभेच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या विरोधात पवई पोलीस ठाण्यात लेखी अर्ज दाखल करण्यात आला आहे. लेखी अर्ज आल्याच्या वृत्ताला पवई पोलिसांनी दुजोरा दिला आहे.
उर्मिला यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यांना काँग्रेस पक्षाने उत्तर मुंबईतुन उमेदवारी दिली आहे. नुकतीच उर्मिला यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. मुलाखती दरम्यान हिंदू हा सर्वाधिक हिंसाचार करणारा धर्म असल्याचे म्हटले होते. त्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याने भाजपाचे प्रवत्ते सुरेश नाखवा यांनी तिच्या विरोधात पवई पोलीस ठाण्यात लेखी अर्ज दिला. उर्मिला यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अनेक हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यांनी ही वक्तव्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सांगण्यावरून केली आहेत असे तक्रार अर्जात म्हटले आहे. पोलिसांनी भा द. वि. कलम 295 अ, 505, 34 नुसार गुन्हा दाखल करावा असेही त्या अर्जात म्हटले आहे. त्या तक्रार अर्जाबाबत पवई पोलिसांची दुजोरा दिला आहे.
उमेदवारी रद्द करा!
मुंबई-हिंदू धर्म हा सर्वात हिंसक धर्म आहे, असे सार्वजनिक ठिकाणी प्रक्षोभक विधान करणाऱया काँग्रेसच्या उत्तर लोकसभेच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांची उमेदवारी रद्द करावी, अशी तक्रार मुंबईतील चैतन्य जोशी या व्यावसायिकांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. या तक्रारीची गंभीर दखल घेत येत्या 48 तासांत या संदर्भात योग्य ती कारवाई करू, असे आश्वासन आयोगाने दिले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, स्वतःचा प्रचार करताना काही राजकीय उमेदवारांनी बेताल विधाने करायला सुरुवात केली आहे. त्यात आता उर्मिला मातोंडकर यांची भर पडली आहे, असे चैतन्य जोशी म्हणाले, ‘मी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही. मी एक सर्वसामान्य हिंदू आहे. म्हणूनच उर्मिला यांनी केलेल्या विधानाचा मी निषेध करतो. हिंदू धर्माने कधीही कुणावर आक्रमण केले नाही, की, हिंसक कृती केल्या नाहीत. कुणीही कोणत्याही धर्माचा अपमान करता कामा नये. असे करून निवडूनही येता कामा नये. हा उघडपणे आचारसंहितेचा भंग आहे. त्यामुळे उर्मिलाचा उमेदवारी अर्ज रद्द करावा,’ असे जोशी यांनी लेखी तक्रारीत म्हटले आहे.
























































