
सामना ऑनलाईन । यवतमाळ
शरद पवार मुख्यमंत्री असताना नागपूरमध्ये गोवारी समाजाने मोर्चा काढला होता. या मोर्चात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये शंभरहून अधिक लोकं मृत्यूमुखी पडले होते. गोवारी यांचे रस्त्यावर वाहिलेलं रक्त प्रसारमाध्यमात छापले जाऊ नये म्हणून रस्ते धुण्यात आले. रस्त्यावरचे डाग तुम्ही धुतले असेल पण तुमच्या हाताला लागलेलं गोवाऱ्यांचं रक्त अजूनही तसंच आहे आणि त्या रक्ताळलेल्या हाताने आमच्याकडे बोट दाखवून विचारू नका. लाज वाटते का? असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी यवतमाळच्या सभेमध्ये केला. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीच्या उमेदवार खासदार भावना गवळी यांच्या प्रचारार्थ यवतमाळ येथे घेतलेल्या जाहीर सभेत त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
आगामी लोकसभा निवडणूक केवळ शिवसेना-भाजपा किंवा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान आणि भावना गवळी यांना खासदार करण्यासाठी नाही, ही निवडणूक तुमच्या सगळ्यांचं आणि देशाचं भवितव्य ठरवणारी असल्याचेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. तसेच शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका असे आवाहन त्यांनी यावेळी केले. शेतीतलं काही कळत नसलं तरी शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू मला कळतात असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण देणार असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
‘जय जवान, जय किसान’ अशी घोषणा ज्या देशात दिली जाते या देशात विरोधक जवानांच्या शौर्याचे पुरावे मागतात. राजद्रोहाचे कलम रद्द करू असे विरोधक म्हणतात. 370 हटवणार नाही असे म्हणत जम्मू-कश्मीरला हिंदुस्थानपासून वेगळे करण्याची भाषा करणाऱ्या फारूख अब्दुल्ला यांना पाठिंबा देतात. राजद्रोहाचे कलम काढून टाकणाऱ्या लोकांच्या हातात देश देणार का? असा खडा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी या देशात राहायचे असेल तर येथील कायदे पाळायलाच हवे. जो पाळणार नाही त्याला कायद्याने शिक्षा होणारच, असेही ठासून सांगितले.































































