कोलकाता आज चेन्नईला भिडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चेन्नई ः ‘आयपीएल’ टी-20 क्रिकेट स्पर्धेत उद्या (दि.9) चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन अव्वल संघांमध्ये वर्चस्वाची लढाई रंगणार आहे. उभय संघांनी पाचपैकी चार लढती जिंकल्या असून, केवळ एक-एक सामना गमावला आहे. दोघांच्याही खात्यात 8 गुण असले, तरी नेट सरासरीच्या जोरावर कोलकाता संघ अव्वल स्थानावर असून, चेन्नई दुसऱया स्थानी आहे.
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स व किंग्ज इलेव्हन पंजाब या संघांना पराभूत केले. आतापर्यंत केवळ मुंबई इंडियन्सनेच चेन्नईचा विजयरथ रोखलेला आहे. दुसरीकडे कोलकाता संघाने सनरायझर्स हैदराबाद, पंजाब, बंगळुरू व राजस्थान या संघांना धूळ चारलेली आहे. दिल्ली कॅपिटल्सने सुपर ओव्हरपर्यंत ताणलेल्या लढतीत कोलकात्यावर सनसनाटी विजय मिळविला होता. सुपर फॉर्ममध्ये असलेल्या चेन्नईकडे कर्णधार महेंद्रसिंग धोनी आहे. दुसरीकडे कोलकात्याची फलंदाजी आणि गोलंदाजीची भट्टी एकदम जमली आहे. बंगळुरूविरुद्ध तर आंद्रे रसेलने अंदाधुंद फलंदाजी करून कोलकात्याला सनसनाटी विजय मिळवून दिला होता. त्यामुळे चेन्नई व कोलकाता यांच्यातील तुल्यबळ लढतीकडे तमाम क्रिकेटशौकिनांचे लक्ष असेल.
कोलकात्याकडे ख्रिस लीन, सुनील नरिन, रॉबिन उथप्पा, नितीश राणा, कर्णधार दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल व शुभमन गिल असे एकापेक्षा एक सरस फलंदाज आहेत. चेन्नईकडेही शेन वॉटसन, फाफ डू प्लेसिस, सुरेश रैना, कर्णधार महेंद्रसिंग धोनी, अंबाती रायडू, केदार जाधव व रवींद्र जाडेजा अशी फलंदाजांची फळी आहे. गोलंदाजीबाबत बोलायचे झाल्यास चेन्नईकडे इम्रान ताहिर, दीपक चहर, हरभजन सिंग, स्कॉट कुग्गेलिइजन अशी विविधतेने नटलेली गोलंदाजी आहे. दुसरीकडे कोलकात्याकडेही पीयूष चावला, सुनील नरिन, आंद्रे रसेल असे पर्याय आहेत.
आजची लढत
चेन्नई सुपर किंग्ज वि. कोलकाता नाइट रायडर्स (चेन्नई)
थेट प्रक्षेपण रात्री 8 वाजता