प्रत्येक वीज ग्राहकावर 150 रुपयांचा वाढीव बोजा,‘महावितरण’च्या नियोजनशून्य कारभारामुळे भुर्दंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बापू सुळे, मुंबई

ऑक्टोबर हीटच्या पार्श्वभूमीवर महावितरणने खरेदी केलेल्या महागडय़ा विजेमुळे राज्यातील प्रत्येक वीज ग्राहकावर 150 रुपयांचा वाढीव बोजा पडल्याचे समोर आले आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात उकाडा वाढल्याने राज्याची विजेची दैनंदिन मागणी 21 हजार मेगावॅटवर गेली होती. वाढलेली ही मागणी पूर्ण करण्यासाठी महावितरणने जवळपास 229 कोटी युनिट वीज केंद्रीय वीज एक्स्चेंजमधून साडेपाच-सहा रुपये प्रतियुनिट दराने खरेदी केली होती. महावितरणचा सरासरी वीज खरेदी दर चार रुपये असताना जादा दराने खरेदी केलेल्या या विजेसाठी 350 कोटी रुपये अतिरिक्त मोजावे लागले असून त्याचा भुर्दंड ग्राहकांना बसला आहे.

महावितरणचे राज्यभर अडीच कोटी ग्राहक असून त्यांच्याकडून दररोज सुमारे 16 हजार मेगावॅटपासून 20 हजार मेगावॅटपर्यंत विजेची मागणी नोंदवली जाते. तर ऑक्टोबर हीटमुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात विजेची मागणी वाढते.  त्या पार्श्वभूमीवर महावितरणने महानिर्मितीबरोबरच एनटीपीसी, अदानी, इंडिया बुल्ससह अन्य खासगी कंपन्यांकडून वीज घेण्यासाठी 35 हजार मेगावॅटचे वीज खरेदी करार केलेले आहेत. त्यामुळे कोणत्याही वेळी या सर्व वीजनिर्मिती कंपन्यांकडून पुरेशी वीज उपलब्ध होणे गरजेचे आहे. मात्र सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात राज्याची विजेची मागणी 21 हजार मेगावॅटवर गेली तेव्हा वीज खरेदी करार केलेल्या कंपन्याकडून सुमारे दोन हजार मेगावॅटपर्यंत कमी वीज उपलब्ध झाली. त्यामुळे महावितरणने सप्टेंबरमध्ये 92 कोटी युनिट वीज प्रतियुनिट 5 रुपये 28 पैसे दराने तर ऑक्टोबरमध्ये 137 कोटी युनिट वीज 6 रुपये 11 पैसे दराने केंद्रीय पॉवर एक्स्चेंजमधून खरेदी केली. वीज खरेदी करारानुसार महावितरणला सरासरी 4 रुपये 5 पैसे दराने वीज मिळते. त्या तुलनेत पॉवर एक्स्चेंजमधून घेतलेली वीज महागडी ठरली आहे. त्यामुळे ग्राहकांवर तब्बल 350 कोटी रुपयांचा भार इंधन अधिभाराच्या (एफएसी) माध्यमातून पडला आहे.

वीज खरेदी करार कुचकामी

राज्यातील ग्राहकांना मुबलक वीज उपलब्ध व्हावी म्हणून महावितरणने सुमारे 22 हजार मेगावॅटचे वीज खरेदी करार केले आहेत. तसेच जलविद्युत ऊर्जा, अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांबरोबर सुमारे 13 हजार मेगावॅटचे करार झालेले आहेत. पण नियोजनाच्या अभावामुळे ऑक्टोबरमध्ये पुरेशी वीज उपलब्ध झाली नव्हती. याबाबत महावितरणकडे विचारणा केली असता सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पुरेसा कोळसा  उपलब्ध नसल्याने औष्णिक प्रकल्पातून पुरेशी वीज उपलब्ध होऊ शकली नाही. या आणीबाणीच्या प्रसंगी ग्राहकांना भारनियमनाचे चटके बसू नयेत म्हणूनच पॉवर एक्स्चेंमधून जादा दराची वीज खरेदी करावी लागल्याचे मुख्य जनसंपर्क अधिकारी पी. एस. पाटील यांनी सांगितले.

काय आहे पॉवर एक्स्चेंज

केंद्रीय ऊर्जा मंत्रालयांतर्गत पॉवर एक्स्चेंज काम करते. त्यानुसार वीजनिर्मिती कंपन्यांकडे मागणीशिवाय उपलब्ध असलेली वीज एक्स्चेंजच्या माध्यमातून वितरण कंपन्यांना उपलब्ध करून दिली जाते. याची खरेदी एक दिवस आधी करावी लागते. यामध्ये विजेची उपलब्धता आणि मागणीच्या आधारे दर निश्चित केला जातो.