
सामना ऑनलाईन । मुंबई
देशभरात आजपासून मतदानाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली असून महाराष्ट्रातील सात मतदारसंघांत गुरुवारी मतदान झाले. अनेक ठिकाणी मतदानासाठी सकाळपासून लांबलचक रांगा लागल्या होत्या. दुसरीकडे मतदानानंतर बोटावरची शाई काढायची कशी याचे फंडे गुगलवर सर्च करण्याचे प्रमाणदेखील वाढले होते. गुगल ट्रेंडने ही माहिती दिली आहे.
9 एप्रिलपासूनच मतदान केल्यानंतर लावण्यात आलेली शाई कशी काढावी याबद्दल हिंदुस्थानी तरुण गुगलवर अधिक सर्च करत असल्याचे आढळल्याची माहिती गुगल ट्रेंडने दिली. गुरुवारी मतदानाच्या दिवशीदेखील सकाळी 10 ते 12 या दोन तासांमध्ये मोठय़ा प्रमाणात यासंदर्भातील गुगल सर्च झाले. दुपारनंतर या सर्चमध्ये अचानक मोठी वाढ झाल्याचेही गुगल ट्रेंडच्या वतीने सांगण्यात आले.
दक्षिणेतील राज्ये आघाडीवर
मतदानानंतर बोटावरील शाई काढायची कशी हे सर्च करण्यात दक्षिणेकडील राज्ये आघाडीवर असल्याचे पाहायला मिळाले. यात आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामीळनाडू या राज्यांचा समावेश होता. गुरुवारी मतदानाच्या पहिल्या टप्प्यात आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील सर्व लोकसभा जागांवर मतदान झाल्याने येथे शाई काढण्यासंदर्भातील सर्चमध्ये वाढ दिसली.


























































