
सामना ऑनलाईन । सोलापूर
सोलापूर मतदारसंघातील कट्टर प्रतिस्पर्धी असलेले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ऍड. प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांची सोलापुरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये अचानक भेट झाली. या भेटीमुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
प्रकाश आंबेडकर हे आपल्या कार्यकर्त्यांसह बालाजी सरोवर या हॉटेलमध्ये नाश्ता करत होते. त्यावेळी शिंदे हे तिथे शिवराज पाटील यांना भेटण्यासाठी आले होते. आंबेडकर यांना तिथे पाहताच शिंदे हे त्यांच्या शेजारी जाऊन बसले. या भेटीमध्ये दोघांमध्ये काही राजकीय चर्चा झाली नसल्याचा दावा केला गेला, परंतु दोन दिवसांपूर्वीच सोलापुरातील जाहीर सभेत आंबेडकर यांनी शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्या पार्श्वभूमीवर या भेटीत नक्कीच काहीतरी झाले असणार अशी चर्चा आहे. आंबेडकर हे अकोल्यासह सोलापूर मतदारसंघातूनही निवडणूक लढवत असल्याने शिंदे यांच्या अडचणी वाढल्या असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
























































