
सामना ऑनलाईन । कल्याण
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकीकडे शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रचारात आघाडी घेतली असताना राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील यांची डोकेदुखी मात्र वाढली आहे. महाआघाडीतील घटकपक्ष काँग्रेसचे कार्यकर्ते अजूनही प्रचारात सहभागी होताना दिसत नाहीत. हे कमी म्हणून की काय, कल्याण-डोंबिवलीत राष्ट्रवादीचे अस्तित्व काय? असा प्रश्न करत मनसेने बाबाजी पाटील यांना उघड विरोध केला आहे. त्यामुळे प्रचारात महाआघाडी बॅकफूटवर असल्याचे चित्र आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघात सलग सहा वेळा राष्ट्रवादीचा मोठय़ा मताधिक्याने शिवसेनेने धोबीपछाड केला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीत कल्याणची जागा राष्ट्रवादीच्या वाटय़ाला आहे. कुणीच उमेदवारी घेत नसल्याने ठाणे महापालिकेचे नगरसेवक बाबाजी पाटील यांना राष्ट्रवादीने तिकीट दिले आहे. मात्र महाआघाडीत कमालीची सामसूम आहे. याउलट महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा जनसंपर्क सुरूही झाला. गेल्या निवडणुकीत काँग्रेसने मदत केली नाही, असा थेट आरोप राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी केला होता. यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्याही झडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आता वरिष्ठ पातळीवर आघाडी झाली असली तरी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांची मने अजूनही जुळलेली नाहीत.






















































