हम होंगे कामयाब!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पुणे

वर्ल्ड कपसारख्या सर्वोत्तम स्पर्धेत खेळायला मिळणे हे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. त्यातच क्रिकेटवेडय़ा हिंदुस्थानमध्ये प्रचंड स्पर्धा असल्याने अनेकांचे हे स्वप्न अपूर्णच राहते. त्यामुळे क्रिकेटविश्वातील या सर्वोच्च स्पर्धेसाठी हिंदुस्थानी संघात निवड होणे ही आमच्यासाठी भाग्याची बाब होय. आता विश्वचषक स्पर्धेसाठी संघात झालेली निवड सार्थ ठरविण्यासाठी आम्ही मैदानावर जिवाचे रान करू. ‘हम होंगे कामयाब’ असा निर्धार विश्वचषक संघातील काही खेळाडूंनी बोलून दाखवला.

स्वप्न सत्यात उतरले!

माझ्यासारख्या नवख्या खेळाडूची विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी ‘टीम इंडिया’त निवड होणे हे माझे भाग्यच होय. विश्वचषक स्पर्धेसाठी देशाचे प्रतिनिधित्व करायला मिळावे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. स्वप्न सत्यात उतरल्याने झालेला आनंद मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही.

विजय शंकर (अष्टपैलू)

वर्ल्ड कप खेळण्यासाठी उत्सुक!

2007 च्या विश्वचषक स्पर्धेत मी ‘टीम इंडिया’चा सदस्य होतो, मात्र त्यावेळी एकही सामना खेळायला मिळाला नाही. त्यानंतर 2011 व 2015च्या विश्वचषक स्पर्धेसाठी माझी निवड झाली नव्हती. तब्बल 12 वर्षांनंतर पुन्हा विश्वचषक स्पर्धेसाठीच्या संघात निवड झाल्याने अत्यानंद झाला. विश्वचषक स्पर्धेत खेळायचे स्वप्न यावेळी तरी पूर्ण होईल.

दिनेश कार्तिक (यष्टिरक्षक)

वर्ल्ड कपमध्येही फॉर्म कायम राखणार!

‘वर्ल्ड कपमध्ये दुसऱयांदा हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करायला मिळणे ही माझ्यासाठी भूषणावह बाब होय. सध्या मी कारकीर्दीत सर्वोत्तम फॉर्ममध्ये असून फिटनेसही चांगला आहे. हाच फॉर्म वर्ल्ड कपमध्येही कायम राखण्यासाठी मी आतूर आहे. कसोटी क्रिकेटमुळे मला आत्मविश्वास मिळाला. आता देशासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्याची हीच योग्य वेळ होय.’

मोहम्मद शमी (वेगवान गोलंदाज)