विजयाचा षटकार कोण मारणार? मुंबई–दिल्ली भिडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

रिषभ पंतच्या झंझावाती फलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सला घरच्या वानखेडे स्टेडियमवर धूळ चारली. आता या पराभवाचा वचपा काढण्याची सुवर्णसंधी रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सकडे असणार आहे. मुंबई इंडियन्स व दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये उद्या आयपीएलची महत्त्वाची लढत होणार असून उभय संघांमधील ही लढत नवी दिल्ली येथे रंगणार आहे. यावेळी प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी चुरस लागली असतानाच दोन्ही संघ स्पर्धेतील सहावा विजय मिळवण्यासाठीही जिवाचे रान करताना दिसणार आहेत.

रोहितच्या सेनेला फलंदाजीवर घ्यावी लागणार मेहनत
मुंबई इंडियन्सने आतापर्यंत आठ सामन्यांपैकी पाचमध्ये विजय मिळवले असले तरी अद्याप या संघाला सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयश आले आहे. हा संघ फलंदाजी विभागात कमकुवत ठरत आहे. रोहित शर्मा, क्विण्टॉन डी कॉक, हार्दिक पांडय़ा, कृणाल पांडय़ा, कायरॉन पोलार्ड यांनी अधूनमधून चांगली फलंदाजी केलीय, पण त्यांना सातत्याने चमकदार कामगिरी करता आलेली नाही. प्ले ऑफ लढतींमध्ये प्रवेश करण्यासाठी सर्व संघ सज्ज झाले असतानाच मुंबई इंडियन्सला एखादी चूकही महागात पडू शकते.

यजमानांची फलंदाजी मजबूत
यजमान दिल्ली कॅपिटल्स संघाकडे एकापेक्षा एक असे सरस फलंदाज आहेत. शिखर धवन, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, रिषभ पंत हे स्टार खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये असल्यामुळे उद्याच्या लढतीत या संघाचा आत्मविश्वास गगनाला भिडला असेल. मात्र जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा, कृणाल पांडया, हार्दिक पांडया या मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचे आव्हान त्यांना परतवून लावावे लागणार आहे.

आजची लढत –
दिल्ली कॅपिटल्स वि. मुंबई इंडियन्स
नवी दिल्ली, रात्री 8 वाजता