निवडणूक प्रचाराचा सुपर संडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

लोकसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वीचा शेवटच्या रविवारच्या सुट्टीचा मुहूर्त साधत सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी पदयात्रांपासून  प्रचार यात्रा आणि मोटरसायकल रॅलींचा धडाका लावला होता. दुपारच्या रणरणत्या उन्हात उमेदवारांनी प्रचार केला.

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सोमवार, 29 एप्रिल रोजी मुंबईत मतदान होणार आहे. मुंबईत आता प्रचाराची रंगत  वाढत असून 27 एप्रिलला शनिवारी सायंकाळी निवडणूक प्रचार संपुष्टात येईल. त्यामुळे प्रचाराच्या दृष्टीने आजचा रविवारचा दिवस उमेदवारासाठी अतिशय महत्त्वाचा होता. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार अरविंद सावंत यांनी पदयात्रा काढली होती. तर दक्षिण-मध्य मुंबईतील महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी चेंबूरच्या लाल डोंगर, सिंधी कॉलनी, वाशी नाका, जिजामाता नगर, माहुलगाव, माहुल म्हाडा कॉलनी परिसरात पदयात्रा  व प्रचार फेरी काढली. उत्तर-पूर्व मुंबईतील महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी घाटकोपर पंतनगर बस डेपोपासून मुलुंडच्या महाराणा प्रताप चौकापर्यंत मोटरसायकल रॅली काढली होती. या रॅलीत शिवसैनिक व रिपाइंचे कार्यकर्तेही मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.

मतदार जनजागृतीसाठी फ्लॅश मॉब

मतदानाबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी, मतदानाचा टक्का वाढावा यासाठी दादरमधील नक्षत्र मॉल येथे रविवारी फ्लॅश मॉबचे आयोजन केले होते. जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी, मुंबई शहर यांच्यातर्फे हा उपक्रम राबविण्यात आला. शेकडो तरुण-तरुणींनी यात भाग घेतला होता. मुंबई शहरातील विविध सार्वजनिक ठिकाणी 28 एप्रिलपर्यंत हे फ्लॅश मॉब होणार आहेत.