
सामना प्रतिनिधी, संगमेश्वर
कोकणात जाणाऱया पर्यटकांसाठी विशेष आकर्षण असलेले मुंबई-गोवा महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या हजारो झाडांची चौपदरीकरणासाठी कत्तल करण्यात आल्याने या मार्गावरील सावली हरपली आहे. त्यामुळे कडक उन्हातून प्रवास करताना क्षणभर विश्रांतीसाठी झाड शोधताना पर्यटक आणि वाहनचालकांची दमछाक होत आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या दोन्ही बाजूला वड, आंबा आणि गुलमोहराची हजारो झाडे उभी होती. उन्हाळ्यामध्ये हजारो वाहनचालक आणि पर्यटक काही किलोमीटर प्रवास केल्यानंतर एका ठरावीक झाडाखाली सावलीसाठी थांबायचे. कडक उन्हापासून दिलासा मिळत असल्यामुळे ही झाडे पर्यटकांचे विशेष आकर्षण होते.
वृक्षारोपण झालेच नाही
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी दोन वर्षांपूर्वी हजारो झाडांची कत्तल करण्यात आली. त्यावेळी या झाडांच्या जागेवर पुन्हा वृक्षारोपण केल्यानंतरच चौपदरीकरणाचे काम सुरू करण्यात येईल असे जाहीर करण्यात आले होते. मात्र दोन वर्षांत एकही झाड या तोडलेल्या झाडांच्या जागेवर लावण्यात आलेले नाही.



























































