‘फनी’ देणार तामीळनाडू, आंध्रला तडाखा,हवामान खात्याचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। चेन्नई

‘फनी’ हे चक्रीवादळ मंगळवारी उत्तर तामीळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनारपट्टीला तडाखा देणार आहे, असा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने या हवेच्या दाबाचे रूपांतर ‘फनी’मध्ये शनिवारीच तयार झालेले आहे. हे चक्रीवादळ रौद्र चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे, असे रविवारी दुपारी 3.02 वा. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱयात म्हटले आहे.

सध्या ‘फनी’ चक्रीवादळ हे बंगालचा उपसागर आणि विषुववृत्तीय हिंदुस्थानी सागरात घोंगावत आहे. हे चक्रीवादळ आंध्र, तामीळनाडूपर्यंत पोहचण्याअगोदर ते परत फिरण्याचीही शक्यता आहे. तसेच हे चक्रीवादळ या किनारपट्टीला धडकेलच असे नाही, अशी माहिती भारतीय हवामान खात्याचे अतिरिक्त महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी दिली.

मच्छीमारांना इशारा

  • समुद्र खवळला असल्याने मासेमारीसाठी जाऊ नये असा इशारा मच्छीमारांना हवामान खात्याने दिला आहे.
  • बांगलादेशने सुचविल्यानुसार चक्रीवादळाला ‘फनी’ हे नाव दिलेले आहे.
  • उत्तर तामीळनाडू, आंध्र प्रदेशची दक्षिण किनारपट्टी या भागात 30 एप्रिल ते 1 मेदरम्यान हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे.
  • या ‘फनी’मुळे श्रीलंका, तामीळनाडू आणि आंध्र प्रदेशातील समुद्र खवळला आहे. समुद्रकिनाऱयावर आजपासून मोठमोठय़ा लाटा धडकत आहेत.