सामना प्रतिनिधी । जालना
जालना जिल्ह्यात भीषण पाणी टंचाईचा सामना शेतकऱ्यांसह नागरिकांना करावा लागत आहे. मजुरांच्या हाताला काम नसल्याने नागरिक गावे सोडून शहरी भागाकडे कामधंद्यासाठी जात आहे. या दुष्काळी परिस्थितीत सोमवारी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात बैल आणून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जालना जिल्ह्यातील भयानक दुष्काळ असतांना आजपर्यंत एकही चारा छावणी जिल्ह्यात चालू नाही. चारा व पाण्यासाठी जनावरे मरत आहे. प्रशासन बघ्याची भुमिका घेत आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. दुष्काळात कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. म्हणून आज 29 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी यांच्या स्वाधीन आमची जनावरे घालीत आहे. तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक व मंडळ अधिकारी हे ग्रामीण भागाचे महत्वाचे घटक असतांना एकही कर्मचारी व अधिकारी मुख्यालयी राहत नसल्यामुळे ग्रामीण भागात दुष्काळाने जनता होरपाळत आहे. तसेच सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रविंद्र भोसले यांनी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक व मंडळ अधिकारी यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश दिले आहेत. न राहिल्यास 1 मे रोजी कार्यवाही करण्याचा इशारा दिला आहे.































































