
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
हिंदुस्थानात दुचाकीस्वारांवर हेल्मेटसक्ती होऊनही हेल्मेट वापरण्याकडे दुर्लक्ष केले जाते. तसेच कमी किमतीतील रस्त्यावर मिळणारी बनावट हेल्मेट वापरली जातात. त्यामुळे आता सरकारने उच्च क्कालिटीच्या हेल्मेट नियमाकलीमध्येच बदल करण्याची तयारी केली आहे. या नव्या हेल्मेटचे वजन 1.5 किलोकरून 1.2 किलोपेक्षा कमी असणार आहे.
हाय क्वालिटी हेल्मेटमध्ये गुणवत्तेसाठी उच्च प्रतीचे साहित्य वापरले जाते. यामुळे त्यांचे वजन काढते. वजन वाढल्याने मानदुखीसारखे विकारही उद्भवतात. त्यामुळे सरकारने हेल्मेटचे वजन कमी करण्याचे ठरवले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे अन्य देशांतून हेल्मेट आयात करणाऱ्या कंपन्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ही हेल्मेट जगभरातील देशांचे नियम पाळून बनविलेली असतात. अमेरिका, युरोपमधील नियम हे हिंदुस्थानापेक्षा अधिक कडक आहेत. तिथल्या हेल्मेटचे वजन 1.2 किलोपेक्षा जास्तच असते. यामुळे ही हेल्मेट आयएसआय स्टॅण्डर्डमधून बाहेर पडणार आहेत. याचा फटका हेल्मेट विक्री करणाऱ्या कंपन्यांना बसणार आहे.
परदेशी हेल्मेटला फटका
गेल्या वर्षी रस्ते वाहतूक मंत्रालयाने काढलेल्या आदेशामध्ये आयएसआय मार्क नसलेली हेल्मेट विकणे हा कायद्याने गुन्हा असल्याचे म्हटले आहे. यामुळे परदेशी हेल्मेटस्ना अडचण निर्माण झालेली आहे. वजनाच्या अटीबाहेर जात असल्याने ही हेल्मेट आयएसआय मार्कसाठी योग्य नाहीत. यामुळे जरीही ही हेल्मेट उच्च प्रतीची असली तरीही ती हिंदुस्थानात वापरण्यासाठी बेकायदेशीर ठरणार आहेत. जर सरकारने अशा प्रकारच्या हेल्मेटसाठी वेगळी तरतूद केली तर ते या कंपन्यांच्या फायद्याचे ठरणार आहे. ही नवीन नियमावली आली की उच्च प्रतीच्या हेल्मेट ही ब्युरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्ड (बीआयएस) प्रमाणपत्राला पात्र ठरविली जातील.

























































