
सामना प्रतिनिधी। मुंबई
नावात बदल करण्याबाबतच्या अर्जात तृतीयपंथीयांसाठी वेगळा रकाना देता येऊ शकतो का त्यावर विचार करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकारला दिले.
नावात बदल करणारा अर्ज तीन वेळा राज्याच्या मुद्रण लेखन सामग्री व प्रकाशन संचालनालयाने फेटाळून लावल्याने हा अर्ज स्वीकारावा यासाठी 29 वर्षीय तृतीयपंथीयाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती एम. एस. संकलेचा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. अर्ज फेटाळल्याप्रकरणी आपण संबंधित कार्यालयात विचारणा केल्यास ऑनलाइन प्रक्रियेत अर्ज स्वीकारत नसल्याचे कारण देण्यात आले. त्यावर न्यायमूर्तींनी सरकारला यासंदर्भात काही उपाय करता येईल का त्यावर विचार करण्याचे आदेश दिले व सुनावणी 14 जूनपर्यंत तहकूब केली.
























































