गडय़ा अपुला देशच बरा; उन्हाळय़ाच्या सुट्टीत ‘बजेट’ सहलीचा नवा ट्रेंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

उन्हाळा सुरू झालाय, शाळांना तर केव्हाच सुट्टी पडलीय. शहराबाहेर फिरायला जायचे प्लॅन्स होत आहेत.  त्यातही ‘बजेट’ ट्रव्हलला पसंती दिली जात आहे. यंदा परदेशात जाण्यापेक्षा खिशाला परवडेल अशी देशातच सहल करूया, असा ट्रेंड पर्यटकांमध्ये दिसत आहे.

उन्हाळय़ाच्या सुट्टीत परदेशातील महागडय़ा सहलींना बाजूला सारत पर्यटकांनी देशाच्या विविध भागांतील सौंदर्यस्थळे, मंदिरे, समुद्रकिनारे, ऐतिहासिक वारसा लाभलेली स्थळे यांना प्राधान्य दिले आहे. याबाबत ‘यात्रा डॉट कॉम’ या ऑनलाइन ट्रव्हल पोर्टलने नुकतेच सर्वेक्षण केले. त्यानुसार 68 टक्के जणांनी उन्हाळी सहलीला जायचे ठरवले आहे. त्यापैकी निम्म्या जणांनी देशांतर्गत पर्यटन करायचे आहे. सर्वेक्षणात  पाच हजारांपेक्षा अधिक पर्यटकांनी सहभाग घेतला. 43 टक्के पर्यटक सहलीच्या 15 दिवस आधी बुकिंग करतात, तर 40 टक्के पर्यटक  तीन महिन्यांच्या आत आगाऊ बुकिंग करतात असे आढळून आले आहे.

  • लोणावळा,  महाबळेश्वर, मुन्नार,  सिमला, श्रीनगर, कोडाइकनाल गंगटोक यासारख्या ठिकाणी उन्हाळी पर्यटनाला पसंती.
  • देशांतर्गत सहलींसाठी प्रति व्यक्ती 10 ते 25 हजार रुपये खर्च करण्याची पर्यटकांची तयारी असल्याचे ‘यात्रा डॉट कॉम’चे सर्वेक्षण.
  • हॉटेलमधील राहण्यासाठी दिवसाला एक हजार ते अडीच हजार रुपये खर्च केला जातो.

देशामध्ये सौंदर्याने नटलेली अनेक स्थळे आहेत. कश्मीरमध्ये पर्यटकांना वाटणारा धोका आता संपला आहे. ईशान्येकडील राज्ये   अनेकांनी बघितली नाहीत. तिथे भरपूर हिरवाई असल्यामुळे उन्हाळय़ात पर्यटकांना त्रास होत नाही अशा ठिकाणचे बुकिंग प्राधान्याने होताना दिसत आहे. परदेशात जाण्यापेक्षा देशाची संस्कृती, वारसा जाणून घेण्याकडे कल दिसत आहे.

केसरी पाटील,  संचालक, केसरी टुर्स

स्वस्त आणि मस्त देशांतर्गत सहलींचा नवा ट्रेंड हिंदुस्थानात निर्माण होत आहे. पर्यटकांची संख्या वाढल्यामुळे सहलींचा खर्चही कमी होऊ लागलाय. त्या खिशाला परवडू लागल्या आहेत. टुर आणि ट्रव्हल्स कंपन्याही सवलती देत आहेत.

शरत धल्ल, सीओओ, यात्रा डॉट कॉम