
सामना प्रतिनिधी । कोल्हापूर
ऐतिहासिक जयप्रभा स्टुडिओ वारसास्थळाच्या वर्ग तीनच्या यादीत असला तरी आयुक्त आणि वारसास्थळ समितीच्या परवानगीनेच तेथे पाडापाडी, दुरुस्ती, विकास व वाणिज्य वापरास मुभा आज येथील न्यायालयाने स्टुडिओच्या मालक व गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना दिली आहे. शिवाय याविरोधात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळासह इतर नऊ चित्रपट व्यावसायिकांनी दाखल केलेला दावाही न्यायालयाने फेटाळला आहे.
कोल्हापूर महापालिका आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याविरुद्ध अखिल भारतीय चित्रपट महामंडळासह नऊ चित्रपट व्यावसायिकांनी दावा दाखल केला होता. स्टुडिओची जागा महाराष्ट्र शासन आणि कोल्हापूर महापालिकेने संपादित करून चित्रपटसृष्टीसाठी जतन करावी. तसेच तेथील इमारतींचा वापर व्यापारीकरणासाठी करू नये. शिवाय प्राचीन इमारतीचे नुकसान करू नये यासाठी लता मंगेशकर यांना कायमस्वरूपी मनाई करावी यासाठी दिवाणी न्यायालयात दावा दाखल करण्यात आला होता तर स्टुडिओची जागा लता मंगेशकर यांनी सन 1959 मध्ये कोर्ट लिलावात खरेदी केल्याने ती त्यांची वैयक्तिक मिळकत आहे. या जागेत बगिचा व सांस्कृतिक केंद्राबाबत सन 2006 मध्ये आरक्षण आले होते, पण दोन वर्षांनी कोल्हापूर महापालिकेने दुसऱया विकास आराखडय़ात या मिळकतीवर कोणतेही सार्वजनिक आरक्षण न ठेवता ते उठविल्यामुळे या जागेवर अन्य कोणत्याही व्यक्ती, संस्था तसेच शासनालाही आपला हक्क सांगता येणार नाही. शिवाय या जागेत मंगेशकर यांनी कोणतीही पाडापाडी केलेली नाही. विक्री करण्याचा निर्णयही घेतला नसल्याचा युक्तिवाद मंगेशकर यांच्या वतीने वकील महादेव आडगुळे यांनी केला. सोमवारी झालेल्या सुनावणीत दोन्ही बाजू ऐकून कोल्हापूरचे जॉइंट सिव्हिल न्यायाधीश ए. ए. भोसले यांनी हा दावा खर्चासह फेटाळल्याची माहिती ऍड. आडगुळे यांनी दिली.


























































