
सामना ऑनलाईन, मोखाडा
गेल्या वर्षी पावसाने वेळेआधीच दडी मारल्याने पालघर जिह्यात मार्च महिन्यापासूनच पाणीबाणी निर्माण झाली आहे. मोखाडय़ात तर भयंकर परिस्थिती असून 86 गावपाडय़ांत एका घोटासाठी विहिरींवर अक्षरशः चेंगराचेंगरी होत आहे. टँकर येताच बायाबापडय़ा एकमेकांना खेचाखेची करत विहिरीला गराडाच घालतात. काही जण थेट कठडय़ावर चढून झुंबड करतात. हंडाभर पाण्यासाठी सुरू असलेल्या ‘याला गाड त्याला गाड’मुळे एखादी दुर्घटना घडण्याची भीती आहे.
पालघर जिह्यातील मोखाडा तालुक्यात पाणीटंचाई अधिकच भीषण बनली आहे. सद्यस्थितीत 86 गावपाडय़ांना 24 टँकरने सन 2011 च्या लोकसंख्येनुसार पाणीपुरवठा केला जात आहे. शासनाने निर्धारित केलेल्या प्रतिमाणशी 20 लिटर एवढे तुटपुंजे पाणी त्यातच आठ वर्षांत वाढलेली लोकसंख्या यामुळे सरकारकडून होणारा पाणीपुरवठा तुटपुंजा पडतो आहे. त्यामुळे टँकर येताच हंडाभर पाणी मिळविण्यासाठी जीव धोक्यात घालून स्पर्धा सुरू होते. विहिरीच्या चहूबाजूंनी, गोलावर चढून चेंगराचेंगरी केली जाते. त्यामुळे पाण्यासाठी आदिवासींचा जीव विहिरीच्या टांगणीला लागला आहे.
एक दिवसाआड पाणीपुरवठा
तालुक्यातील धामोडी, किनिस्ते, शेलमपाडा, डोंगरवाडी आणि कासिंद या गावांच्या लोकसंख्येनुसार येथे रोज एक टँकर पाणी देणे बंधनकारक आहे. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून या गावांना दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. एकीकडे शासन दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी उपाययोजना आखत आहे. मात्र सरकारीबाबू या धोरणांची पायमल्ली करत असल्याचे मोखाडय़ात टँकरने पाणीपुरवठय़ाच्या अंमलबजावणीवरून समोर आले आहे.
गेल्या वर्षी 77 गावपाडय़ांना 22 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. मात्र यंदा मे महिन्याच्या सुरुवातीलाच मोखाडय़ात टंचाईग्रस्त गावपाडय़ांची संख्या 86 वर पोहोचली आहे.
वाढलेली लोकसंख्या, नागरिकांच्या वाढलेल्या गरजा, स्वच्छ भारत अभियानांतर्गत घरोघरी बांधलेली शौचालये आणि जनावरांना पाणी यामुळे हे पाण्याचे प्रमाण तुटपुंजे पडत आहे.






























































