
सामना प्रतिनिधी। मुंबई
पावसाळय़ात या वर्षी तब्बल 28 दिवस समुद्राला मोठी भरती येणार असून यावेळी 4.5 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळणार आहेत. यामध्ये 12 दिवस ‘नीप टाइड’ही राहणार आहे. त्यामुळे पालिकेने सुरक्षेच्या उपाययोजना तैनात ठेवण्यासाठी कार्यवाही सुरू केली असून मुंबईकर आणि पर्यटकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
पावसाळय़ात हायटाइड असताना समुद्रात पाणी वाहून नेणारे फ्लड गेट बंद केले जातात. अशा वेळी 4.5 मीटर उंचीपेक्षा जास्त उंच लाटा उसळत असल्यास आणि अतिवृष्टी सुरू असल्यास पावसाचे पाणी समुद्रात जाण्यास अडथळा निर्माण झाल्यामुळे पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात. शिवाय जोरदार लाटांमुळे समुद्रकिनाऱयावरही धोकादायक स्थिती निर्माण होते. या पार्श्वभूमीवर पालिकेकडून पावसाळय़ात हायटाइडचे दिवस जाहीर केले जातात. या दिवशी सुरक्षेसाठी पालिकेकडून ठोस उपाययोजना करण्यात येत असल्या तरी अतिउत्साही पर्यटक-मुंबईकरांमुळे जीवितहानी होण्याचा धोका निर्माण होतो. दरम्यान, हायटाइड आणि नीपटाइडच्या पार्श्वभूमीवर पालिकेनेही सुरक्षेच्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. या दोन्ही भरतीच्या याद्या वाहतूक पोलीस, अग्निशमन दल आणि संबंधित अन्य प्राधिकरणांना पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून पाठवण्यात आल्या आहेत. यामुळे या भरतीच्या दिवशी पालिकेबरोबरच विविध प्राधिकरणे आणि मुंबईकर सुरक्षेच्या दृष्टीने सावध राहतील अशी अपेक्षा आहे.
काय आहे ‘नीपटाइड’
समुद्रात आलेली हायटाइड आणि लो टाइड यांच्यातील उंचीमध्ये अत्यंत कमी फरक असल्यास नीपटाइडची स्थिती निर्माण होते. यामध्ये ओहोटीची स्थिती ही भरतीसारखीच असते. अशा वेळी अतिवृष्टी झाल्यास फ्लड गेट बंद असल्यामुळे समुद्रात पाणी जाऊ शकत नसल्यामुळे पाणी तुंबण्याचा धोका निर्माण होतो. 29 ऑगस्ट 2017 रोजी अशीच स्थिती निर्माण झाल्याने मुंबईत अनेक ठिकाणी पाणी तुंबले होते. या वर्षी जून महिन्यात 25, 26, 27 तारीखला, जुलै महिन्यात 25, 26, 27 तारीखला आणि ऑगस्ट महिन्यात 24 आणि 25, सप्टेंबर महिन्यात 7, 8, 22, 23 या दिकशी नीप टाइड असणार आहे.
1 सप्टेंबरला सर्वात मोठी भरती
3 जूनपासून सुरू होणाऱया या हायटाइडमध्ये 1 सप्टेंबर रोजी 4.91 मीटर इतक्या सर्वात उंच लाटा उसळणार आहेत. तर ऑगस्टमध्ये शनिवार 3 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट रोजी 4.90 मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. तर बुधवार, 5 जून रोजी 4.68 तर शुक्रवार, 5 जुलै रोजी 4.79 उंचीच्या लाटा उसळणार आहेत.
- या दिवशी हायटाइड
- 2 जून 4.54 मीटर
- 3 जून 4.69 मीटर
- 4 जून 4.78 मीटर
- 5 जून 4.79 मीटर
- 6 जून 4.74 मीटर
- 7 जून 4.60 मीटर
- 31 जुलै 4.53 मीटर
- 1 ऑगस्ट 4.74 मीटर
- 2 ऑगस्ट 4.87 मीटर
- 3 ऑगस्ट 4.90 मीटर
- 4 ऑगस्ट 4.83 मीटर
- 5 ऑगस्ट 4.65 मीटर
- 29 ऑगस्ट 4.53 मीटर
- 30 ऑगस्ट 4.77 मीटर
- 1 सप्टेंबर 4.91 मीटर
- 2 सप्टेंबर 4.67 मीटर
- 3 सप्टेंबर 4.54 मीटर
- 27 सप्टेंबर 4.51 मीटर
- 28 सप्टेंबर 4.72 मीटर
- 29 सप्टेंबर 4.63 मीटर
- 30 सप्टेंबर 4.83 मीटर


































































