
सामना ऑनलाईन । मुंबई
पावसाळा काही दिवसांवर आल्यामुळे पालिकेच्या माध्यमातून मुंबईभरात सध्या नालेसफाई जोरात सुरू आहे. दरवर्षी 10 एप्रिलपासून सुरू होणारी नालेसफाई या वर्षी 1 एप्रिलपासूनच सुरू करण्यात आली असून आतापर्यंत मिठी नदी आणि मोठय़ा नाल्यांच्या सफाईचे काम 44.40 टक्के तर छोट्या नाल्यांच्या सफाईचे काम 20.33 टक्के पूर्ण झाले आहे. 31 मेपर्यंत 100 टक्के नालेसफाई करण्याचे पालिकेने उद्दिष्ट ठेवले आहे.
पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मासिक बैठकीत पावसाळापूर्व कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी नालेसफाईसह रस्तेदुरुस्ती, पाणी उपसा करणाऱ्या पंपांची व्यवस्था, मॅनहोल झाकणे, मनुष्यबळ नियोजन यांचा आढावा घेण्यात आला. पालिकेने गेल्या वर्षीपासून वर्षभर नालेसफाई करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीकर तीन टप्प्यांत कर्षभर नालेसफाई करण्यात येणार आहे. यानुसार पहिल्या टप्प्यात 1 एप्रिल ते 31 मेपर्यंत 70 टक्के काम केले जाणार असून 1 जून ते 30 सप्टेंबरपर्यंत या दुसऱ्या टप्प्यात 15 टक्के काम होणार असून 1 ऑक्टोबर ते 31 मार्च 2020 पर्यंत तिसऱ्या टप्प्यात उर्करित 15 टक्के काम केले जाणार आहे. मात्र या वर्षी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नालेसफाईचे काम पूर्ण कसे होणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र पालिकेने योग्य नियोजनातून काम सुरू केल्यामुळे आतापर्यंत 40 टक्क्यांवर काम पूर्ण झाले आहे. 31 मेपर्यंत निर्धारित केलेल्या 70 टक्क्यांतील 100 टक्के काम पूर्ण करणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. शनिवारी झालेल्या बैठकप्रसंगी अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱहाड, प्रवीण दराडे, डॉ. अश्विनी जोशी, उपायुक्त रमेश पवार यांच्यासह संबंधित खात्याचे अधिकारी उपस्थित होते.



























































