चारा छावणी बिलांना विलंब, सावकाराकडून कर्ज काढून छावणीचालक चालवताहेत छावण्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

सामना प्रतिनिधी, जामखेड

चारा छावणी देयक अदा करताना अर्थिक अनियमितता होऊ नये यासाठी छावणी चालकांकडून प्राप्त होणाऱ्या देयकांची तपासणी करण्याच्या कामी संबधित तालुक्यातील सहाय्यक लेखाधिकारी पंचायत समिती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच जिल्हास्तरीय लेखा तपासणी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांनी काढले आहेत. त्यामुळे चारा छावणीचालकांना ऑडिट झाल्यानंतर बिले मिळणार आहे त्यासाठी आणखी 10 दिवसांचा कालावधी जाणार असल्याने छावणी चालकांची अर्थिक घडी कोलमडणार आहे.दोन महिने झाले पदरमोड करून छावणीचालक छावण्या चालवत आहेत. अद्यापही बिले न मिळाल्याने सावकारांकडून व्याजाने किंवा मित्र मंडळी व नातलगाकडून उसणवार पैसे घेऊन छावण्या चालवण्याची वेळ छावणीचालकावर आली आहे. बीले कधी निघणार या प्रतिक्षेत छावणीचालक आहेत.

तालुक्यात चारा छावण्या सुरू होऊन दोन महिने झाले तरी अद्याप त्यांना अनुदान न मिळाल्याने अर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. दुष्काळी परिस्थितीमुळे छावणीचालकांना दैनंदिन चारा, पशुखाद्य खर्च भागवणे अवघड झाले आहे. यावेळी प्रथमच अगोदर ऑडिट व नंतर पेमेंट असे धोरण टंचाई शाखेने घेतल्याने व वाढत्या महागाईमुळे छावणीचालक आर्थिक अडचणीत आले. तालुक्यातील गावोगावी चारा छावण्या झाल्यामुळे गोपालक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जनावरे जगण्यासाठी चारा व पाणी छावणीत मिळत असल्यामुळे गोपालक शेतकऱ्यांनी आपला मुक्काम जनावरासह छावणीत थाटला आहे. आज मितीस तालुक्यातील 67 छावण्यांमध्ये 40 हजार जनावरे आहेत. त्यातच पाण्याअभावी तालुक्यातील ऊस जळाला आहे. त्यामुळे ऊसाच्या पट्ट्यातून चारा म्हणून वाढ्यासहीत ऊस 1800 रुपये टनावरून थेट साडेतीन हजार रुपये झाला आहे. या महागाईमुळे व दररोजचा खर्च भागवताना नाकीनऊ आले आहे. एवढे करून बिल मिळण्यासाठी विलंब होणार आहे. त्यामुळे चारा छावणी चालवणे आव्हान असल्याने अनेकांनी खासगी सावकार गाठून व्याजाने पैसे काढून छावणी चालवण्याची कसरत करित आहेत.

शासनाने 31 मार्च अखेर चारा छावणीमध्ये दाखल लहान जनावरासाठी 35 रूपये तर मोठ्या जनावरासाठी 70 रूपये दर मागील तीन वर्षांपूर्वी ठरवलेले जुने दर छावणीचालकांना ठेवले आहेत त्यामध्ये 1 एप्रिल पासून शासनाने वाढ केली आहे. मोठ्या जनावरांसाठी 90 रूपये तर लहान जनावरांसाठी 45 रूपये असा दर ठरवला आहे.

छावणी चालकांना देयके मिळण्याची किचकट पद्धत
छावणीचालकांना देयके मिळण्यासाठी पंचायत समितीचे सहाय्यक लेखाधिकारी यांना संस्थेचे सर्व रजिस्टर व अभिलेख तपासणी परिशिष्ट अ, ब व क सह पशुधन अधिकारी, तलाठी व छावणी चालक यांचे संयुक्त स्वाक्षरी दैनिक अहवाल, देयकाच्या कालावधीत व्हिजीट बुकच्या नायब तहसीलदार यांनी सांक्षाकित केलेल्या छायांकित प्रत, दंडात्मक आदेशाची प्रत द्यावी लागणार आहे. त्यानंतर लेखाधिकारी अभिलेख तपासणीत कपात करायची रक्कम, जीएसटी वरील रक्कम, संस्थेचे पॅनकार्ड असेल तर दोन टक्के व नसेल तर 20 टक्के कपात तसेच टिनवरील टीडीएस रक्कम 2 टक्के प्रमाणे कपात करून निव्वळ देयकाची बरोबर असल्याचे तालुका समितीचे प्रमाणपत्र जिल्हा लेखा तपासणी पथकाकडे सादर केल्यानंतर त्यांची तपासणी झाल्यानंतर बिले देण्याबाबत टंचाई शाखा तहसीलदार यांना संबधित छावण्यांना देयके देणार आहे. सध्या छावणीचालकांना मार्च अखेपर्यंतचे देयके दिली जाणार आहे.

तालुक्यात चारा छावण्या सुरू होऊन दोन ते अडीच महिने झाले आहे. सर्व खर्च छावण्या चालक करित आहे. यापूर्वी छावणी चालकांना पंधरा दिवसाला पेमेंट मिळत असे. प्रशासनाला मागील अनुभव पाहता छावणी चालकांना झालेले दंड, व बिलापेक्षा जास्त पेमेंट दिले गेल्याने पैसे वसूल करणे जिकिरीचे झाले होते. त्यामुळे आता मात्र यावेळी अगोदर ऑडिट व नंतर पेमेंट असा निर्णय टंचाई शाखेने घेतला आहे. छावणी चालकांचे बिलाचे ऑडिट करण्यासाठी ऑडिटर म्हणून प्रत्येक तालुक्याचा पंचायत समितीचा सहाय्यक लेखाधिकारी यांची नियुक्ती केली आहे. तसे पत्र पंचायत समितीला उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांनी पाठवले आहे. तालुक्यातील 67 छावण्या चालकांच्या दप्तराची तपासणी होणार आहे त्यामुळे देयके मिळण्यासाठी किती कालावधी लागेल याचा मेळ धरून छावणीचालकांना पैशासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे. छावणी सुरू करताना 49 अटी व शर्ती तर देयके मिळण्यासाठी किचकट प्रक्रिया व दररोजचे खर्च भागवणे या साऱ्या कसरती पाहता छावणी चालक त्रस्त झाले आहे.