खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या सात जणांना वन विभागाने केले जेरबंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, अलिबाग

सुधागड तालुक्यात पाली वनविभागाने खवल्या मांजराची तस्करी करणार्‍या सात तस्करांना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. वन विभागाने पकडलेल्या सात आरोपींना पाली न्यायालयात हजर केले असता 9 मे पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेनंतर सुधागड तालुका दुर्मीळ वन्यजिव प्राणी व त्यांच्या अवशेषांची तस्करी करणारे केंद्र बनले आहे. वनविभागाने आरोपिकडून ताब्यात घेतलेल्या खवल्या मांजराची बाजरामध्ये करोडोची किंमत आहे.

पाली वनक्षेत्रपाल सुधागड यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कार मधून खवल्या मांजराची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार वन विभागाने सापळा रचला होता. पाली वाकण रोडवरील पिराचा माळ येथे मारुती सुझुकी वॅगनआर एलएक्सआय कार (एमएच 06/ एएस 1751) कार आली असता दबा धरून बसलेल्या वन विभागाच्या पथकाने कार थांबवून तपासणी केली. कारची तपासणी केली असता डिक्कीत गोणपाटात झाकून ठेवलेले खवले मांजर व एक पिल्लू आढळून आले. हे खवले मांजर व पिल्लू यांचे वजन साडे नऊ किलो असून बाजरामध्ये या खवल्या मांजराची कोट्यवधींची किंमत आहे.

वनविभागाने केलेल्या या कारवाईत मारुती सुझुकी वॅगनआर एलएक्सआय कार (एमएच. 06/ एएस 1751) किंमत 2 लाख रुपये, होंडा पॅशन गाडी क्रमांक (एमएच06/ बिझेड 4130) किंमत 40,000 जप्त केली आहे. तसेच अशोक बबन वाघमारे (27) रा. पंदेरी, ता. मंडणगड, शौकत नशिर मोमीन (44), सुनिल काशिनाथ माने रा. पोयनाड, ता. अलिबाग, यांच्यासह त्यांचे सोबत असणारे चंद्रहास शंकर पाटील (49) रा. मु. डोलवी, ता.पेण, नितीन नारायण पाटील (35) रा. सातघर, ता. अलिबाग, संदीप दत्ताराम हिलम (39) रा. कुंभशेत, ता. माणगाव, ज्ञानेश्वर काशिनाथ पाटील(44) शेतजुई, या सात जणांना वन विभागाने अटक केली आहे. आरोपीविरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता 9 मे पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.