नगर तालुक्यातील निंबळक आणि इसळक येथे दुष्काळ मुक्तीयज्ञ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

नगर तालुक्यातील निंबळक – इसळक या गावांच्या पंचक्रोशीचा दुष्काळ कायमचा हटवण्यासाठी बुधवार दिनांक ८ मे २०१९ पासून ‘दुष्काळ मुक्तीयज्ञास’ आरंभ होत आहे. उद्या सकाळी ९ वाजता निंबळक येथील तलावाजवळ ज्येष्ठ जलमित्र पद्मभूषण अण्णासाहेब हजारे, हिवरेबाजार प्रकल्पाचे प्रवर्तक पोपटराव पवार, आनंदवन प्रगती सहयोग उपक्रमाचे संयोजक सीए कौस्तुभ विकास आमटे, नगरच्या प्रांताधिकारी उज्वला गाडेकर, तहसीलदार उमेश पाटील, भारतीय जैन संघटनेचे आदेश चंगेडिया, नगरमधील उद्योजकांच्या आमी संघटनेचे अशोक सोनवणे-दौलतराव शिंदे- राजेंद्र कटारिया, पाणी फाउंडेशन उपक्रमाचे कार्यकर्ते, विविध सामाजिक संस्था व संघटनांचे कार्यकर्ते आणि स्थानिक जल मित्रांच्या उपस्थितीत या अभियानाचा श्रीगणेशा होईल.

पुढील वीस दिवस, पाऊस सुरू होण्यापूर्वी अहोरात्र सामुदायिक श्रमातून आणि आर्थिक सहयोगातून हे अभियान यशस्वी केले जाणार आहे.

१९७२ नंतर प्रथमच निंबळक मधील पाणीपुरवठा करणारे दोन्ही मोठे साठवण तलाव संपूर्ण कोरडे पडले. त्याचा गंभीर दुष्परिणाम पिण्याचे पाणी ,दुधाचा व्यवसाय, लोकांचे आणि जनावरांचे आरोग्य यावर झाला. मागील एक महिन्यापासून ईसळक आणि निंबळक परिसरातील युवकांनी पाण्यासाठी सामुदायिक संवाद सभा घेतल्या. स्नेहालय संस्था आणि पाणी फाउंडेशनच्या नगर तालुक्याच्या पथकाने जलक्रांतीत प्रत्येकाची भागीदारी कशी असली पाहिजे, यावर मार्गदर्शन केले.

कौस्तुभ आमटे यांनी भूगर्भशास्त्रज्ञ आणि जलसंधारण तज्ञांचे पथक येथे आणले. पाणी फाऊंडेशनचे सहकार्य याकामी मिळाले. तज्ज्ञ पथकाने येथील जमिनीचा आणि सर्व परिसराचा अभ्यास केला. त्यातून दोन्ही तलावांतील गाळ काढण्याचे नियोजन करण्यात आले.

स्नेहालय पुनर्वसन संकुल एमआयडीसी येथे निंबळक आणि इसळक येथील जलमित्रांची महासभा झाली. त्यात उद्यापासूनचा दुष्काळाविरुद्धचा निर्णायक लढा लढण्याचे सर्व नियोजन करण्यात आले.

तलावातील गाळ काढून तो येथील मुरमाड जमिनीत टाकल्याने येथील जमिनीची उत्पादकता आणि पोत सुधारणार आहे. पंचक्रोशीतील शेती सुजलाम होण्याबरोबरच येत्या पावसाळ्यात येथे ३० हजार वृक्ष लागवड करण्याचेही नियोजन करण्यात आले. यातील मोठे काम पोकलान आणि डंपर यासारख्या यंत्रसामग्रीने केले जाणार आहे. त्यासाठी इसळक निंबळक येथील ग्रामस्थांनी आर्थिक सहयोग देण्याची चळवळ सुरू झालेली आहे. वृक्ष लागवड,रस्ते आणि इतर कामे सामूहिक श्रमदानातून होणार आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रातून येथे श्रमदानासाठी येणाऱ्या युवा कार्यकर्त्यांची निवास आणि भोजनाची सुविधा स्नेहालय संस्थेत करण्यात आली आहे. या उपक्रमास आर्थिक सहयोग देण्याची किंवा श्रमदानाची इच्छा असलेल्या निंबळक आणि इसळक येथील नागरिकांनी योगेश गेरंगे यांच्याशी ९४०४९७७७२३ या क्रमांकावर तर बाहेरील नागरिकांनी सुनील मोरे यांच्याशी ( ९९७५७६५६२९ या क्रमांकावर) संपर्क साधावा, असे आवाहन या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व इसळक आणि निंबळकचे ग्रामस्थ, सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांनी केले आहे.