
सामना ऑनलाईन । मुंबई
देशभरात तब्बल 207 वाघांचा अवैध शिकार तसेच विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. तर सहा वर्षांत तब्बल 615 वाघांचा मृत्यू झाला आहे. अवैध शिकारीसाठी रचलेल्या विजेच्या सापळय़ात वाघ सापडतात आणि त्यांचा मृत्यू होतो. अशा प्रकारे अवैध शिकारीचे प्रमाण देशात मोठे असल्याचे ‘नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऍथॉरिटी’च्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. 2012 ते 2018 या सहा वर्षांतील आकडेवारी एनटीसीएने जारी केली आहे. विशेष म्हणजे 118 वाघांपैकी 18 टक्के वाघांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे उघड होऊ शकले नाही. राज्य वन विभागांनी नेमकी माहिती उघड केलीच नाही किंवा याबाबतची माहिती गोळा केलीच नाही. दरम्यान, 2016 नंतर सर्वाधिक वाघांचा मृत्यू विजेच्या धक्क्यानेच झाल्याचे एनटीसीएचे अतिरिक्त संचालक अनुप नायक यांनी सांगितले.
मध्य प्रदेशात 148 वाघांचा मृत्यू झाला. देशभरात वाघांच्या मृत्यूमध्ये या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो. त्यापाठोपाठ महाराष्ट्र (107), कर्नाटक (100) आणि उत्तराखंड (82) यांचा क्रमांक लागतो. 124 वाघांची शिकार झाल्याचे त्यांच्या शवविच्छेनानंतर समोर आले. z 245 वाघांचा नैसर्गिक मृत्यू झाला, तर 76 वाघ रेल्वे किंवा रस्ते अपघातात मृत्युमुखी पडले.



























































