लेख – नक्षलवादाचे आव्हान : सर्वंकष रणनीती हवी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सुनील कुवरे

गडचिरोलीतील नक्षलवाद्यांच्या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या वर्षी गडचिरोलीत 40 नक्षलवाद्यांना ठार मारण्यात आले होते. ते आता पुन्हा डोके वर काढणार नाहीत असे दावे केले मग नक्षली कुठून आले? नक्षलवादासारखा देशांतर्गत आतंकवाद संपवायचा असेल तर केवळ गोळीने उत्तर देऊन चालणार नाही. नक्षलवाद्यांना माफ करता येणार नाही, परंतु भविष्यात असे हल्ले रोखण्यासाठी सगळय़ाच बाजूंनी विचार करायला हवा. सरकारने इतरही काही गोष्टींचा वापर करायला हवा. नक्षलवादाचे आव्हान मोडून काढण्यासाठी सर्वंकष रणनीती आखायला हवी.

महाराष्ट्रदिनीच गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी शीघ्र कृती पथकाच्या ताफ्यावर आयईडी स्फोटकांनी हल्ला केला. या हल्ल्यात 15 जवान शहीद झाले. या हल्ल्यापूर्वी नक्षलवाद्यांनी जवळपास 36 वाहनांना आगी लावल्या. या हल्ल्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. नक्षलवादाचा त्रास गेली अनेक वर्षे या देशात आहे. देशातील 13 राज्यांतील 103 जिह्यांत या नक्षलवाद्यांनी हातपाय पसरले आहेत. गेल्या वर्षी गडचिरोलीच्या जंगलात 40 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले गेले. नक्षलवाद्यांना rगडचिरोलीत 2009 मध्ये तीन वेळा भूसुरुंग स्फोट केले होते. त्यात 58 पोलीस जवान शहीद झाले होते. त्या घटनेनंतर नक्षलवाद्यांनी अशा प्रकारची मोठी कारवाई केली. नक्षलवाद ही हिंदुस्थानातील कडव्या साम्यवादी संघटनांनी चालवलेली सशस्त्र चळवळ आहे. नक्षलवादाचा उगम हा पश्चिम बंगाल राज्यातील नक्षलवाडी गावात झाला. गेली 52 वर्षे हा नक्षलवाद हिंदुस्थानात सुरू आहे. शोषण, अन्याय, अत्याचार, भांडवलशाहीला विरोध करणारे हे नक्षली स्वतःला आदिवासींचे कैवारी समजतात. या नक्षलवाद्यांनी महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, छत्तीसगड आदी राज्यांतील काही भाग व्यापून टाकला आहे. देशाच्या प्रशासकीय व्यवस्थेला आव्हान देत आहेत. त्यांच्या कक्षा कमी होण्याऐवजी आणखी रुंदावत आहेत.

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार हिंदुस्थानात 1998 ते 2018 या वीस वर्षांच्या कालावधीत नक्षलवादी हल्ल्यात 12 हजाराहून नागरिकांचा बळी गेला. त्यात पोलीस आणि सुरक्षा दलाचे 2700 कर्मचारी मृत्युमुखी पडले. आजही नक्षलवादी संघटना काही राज्यात सक्रिय आहेत. गडचिरोलीतील आताचा हा हल्ला नक्षलवाद्यांच्या नियोजनानुसार यशस्वी झाला. हे सरकारच्या दृष्टीने हे मोठे अपयश आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. पण त्यात नक्षलवादी संघटना व त्यांच्या नियोजनाचे यश असे म्हणता येणार नाही, तर सुरक्षा दलाच्या नियोजनातील हे मोठे अपयश आहे. सुरक्षा दलाच्या पथकांच्या हालचालीची पुरेपूर माहिती नक्षली यंत्रणेकडे असते हे अनेकदा सिद्ध झाले आहे. बंदुकीच्या व स्फोटाच्या जोरावर देशांतर्गत सरकारला आव्हान देत आहे. सुरक्षा यंत्रणांना तो जुमानत नाही हा चिंतनाचा विषय आहे.

गडचिरोलीतील नक्षलवाद्यांच्या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नक्षलवादासारखा देशांतर्गत आतंकवाद संपवायचा असेल तर केवळ गोळीने उत्तर देऊन चालणार नाही. पोलीस जवानांची हत्या अतिशय घृणास्पद, निंदनीय आहे यात वाद नाही. ही हत्या करणाऱया नक्षलवाद्यांना माफ करता येणार नाही, परंतु भविष्यात असे हल्ले रोखण्यासाठी सगळय़ाच बाजूंनी विचार करायला हवा. मोदी सरकारने काही पावले टाकली आहेत, मात्र, त्यांची अंमलबजावणी वेगाने झाली नाही. दोन वर्षांपूर्वी केंद्र सरकारने नक्षलवाद संपवून टाकण्यासाठी दहा राज्यांची संयुक्त बैठक घेतली होती. या बैठकीत नक्षली हल्ल्याचा सामना करण्यासाठी रणनीती आखली गेली होती. त्यात आठ कलमी कार्यक्रम आखण्यात आला होता. पण त्याचे पुढे काय झाले? पुनःपुन्हा नक्षली हल्ले का होतात? गेल्या वर्षी गडचिरोलीत 40 नक्षलवाद्यांना ठार मारण्यात आले होते. ते आता पुन्हा डोके वर काढणार नाहीत असे दावे केले मग नक्षली कुठून आले? लोकशाही असलेल्या हिंदुस्थानात नक्षलवादाला जर इतके स्वातंत्र्य मिळत असेल तर तो लोकशाहीचा पराभव ठरतो असे म्हटले तर वावगे ठरू नये. कारण कोणी शस्त्र हाती घेऊन लोकशाही व्यवस्थेला आव्हान देत असेल तर त्या शक्तींना ठेचून काढले पाहिजे यात दुमत होऊ शकत नाही. कारण देशद्रोह करणाऱया नक्षलवाद्यांना धडा शिकवण्यासाठी कठोर पावले टाकायला हवीत. काही वर्षांपूर्वी केंद्रीय गृह सचिव असलेल्या गोयल यांनी काही शिफारशी सुचविल्या होत्या. त्यात प्रामुख्याने नक्षलवादाचा प्रभाव असलेल्या भागांत लष्कराची कायमस्वरूपी छावणी उभारावी म्हणजे नक्षलवाद्यांच्या हालचालींवर मर्यादा येतील. शिवाय नक्षलवादाला मोठय़ा प्रमाणात लगाम घातला जाईल, पण या शिफारशींकडे दुर्लक्ष केले गेले. तसेच एका राज्याचे पोलीस दुसऱया राज्यातील नक्षलवाद्यांना सहसा हात लावीत नाहीत. यातून मार्ग काढण्यासाठी एक राष्ट्रीय धोरण आखण्याची व घटनेत तरतूद करण्याची गरज आहे. तसेच नक्षलवाद्यांचा रणनीतीचा अभ्यास करून केंद्रीय राखीव पोलिसांना प्रशिक्षण देण्यात यावे. दुर्गम भागात नक्षलवाद्यांचा जोर असतो हे अनेकदा संबंधितांच्या लक्षात आले असेलच. या भागात नक्षलवाद फोफावण्यामागे जी कारणे असू शकतात ती लक्षात घेऊन त्याप्रमाणे कारवाई करण्याचे आव्हान सरकारपुढे आहे. त्यामुळे नक्षलीचे समूळ उच्चाटन करू असे सरकारने म्हटले असले तरी केवळ पोलिसी कारवाई करून शक्य होणार नाही. कारण अशा कारवाईत व्यक्तींचा बळी जात असला तरी विचारांचा माग कायम राहतो आणि या विचारांच्या जोरावर नवनवे नक्षलवादी पुढे येत राहतात. तेव्हा सरकारने या कारवाईच्या बरोबरच इतरही काही गोष्टींचा वापर करायला हवा. नक्षलवादाचे आव्हान मोडून काढण्यासाठी सर्वंकष रणनीती आखायला हवी.