‘इंडियाज मोस्ट वाँटेड’ ची कथा यासीन भटकळवर आधारीत?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

अर्जुन कपूरच्या आगामी ‘इंडियाज मोस्ट वांटेड’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारीत आहे. इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा संस्थापक यासीन भटकळ याच्यावर चित्रपट आधारीत असल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत चित्रपटाशी संबंधीत टीमने मौन पाळले असून एकही गोळी न चालवता एका मोस्ट वाँटेड दहशतवाद्याला अटक करण्याऱ्या अधिकाऱ्यांची कथा चित्रपटात आहे, असे सांगण्यात आले. हा चित्रपट 24 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

नुकत्याच जारी झालेल्या ‘इंडियाज मोस्ट वांटेड’ च्या ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारीत आहे. हा चित्रपट यासीन भटकळला अटक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर बेतलेला असल्याची चर्चा आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारीत असल्याचे चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार गुप्ता यांनी सांगितले. मात्र, चित्रपट नेमका कोणावर आधारीत आहे, याची माहिती त्यांनी दिली नाही. ही सत्य घटना नेमकी कशावर आधारीत आहे, याची माहिती घेण्यासाठी प्रेक्षकांना हा चित्रपट पाहावा लागणार आहे, असे ते म्हणाले.

ट्रेलर लाँचवेळी चित्रपटाच्या टीमने सांगितले की, बिहारच्या पाच धाडसी अधिकाऱ्यांची ही कहाणी आहे. ज्यांनी एकही गोळी न चालवता एका मोस्ट वाँटेड दहशतवाद्याला अटक केली. हा दहशतवादी म्हणजे हिंदुस्थानातील ओसामा होता. त्याने 2007 ते 2013 या काळात देशभरातील 52 ठिकाणी बॉम्बस्फोट घडवले होते. त्या दहशतवाद्यांच्या नावाबाबत गुप्तता पाळण्यात येत असली तरी तो दहशतवादी यासीन भटकळ असल्याची चर्चा आहे. यासीन नेपाळमध्ये वेष पालटून डॉक्टर बनून राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतरच्या इंटेलिजन्स ब्युरोचे अधिकारी त्याच्या मागावर होते. अधिकारी प्रभात कुमार यांची भूमिका अर्जुन कपूर साकारत आहे. प्रभात कुमार यांच्यासोबत राजेश शर्मा, प्रशांत अलेक्झांडर, गौरव मिश्रा आणि आसिफ खान या अधिकाऱ्यांनी शिताफीने 29 आगस्ट 2013 मध्ये भटकळला अटक केली. भटकळ सध्या तिहार तुरुंगात आजन्म कारावासाची शिक्षा भोगत आहे.