
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मतदान केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्वेषाचे राजकारण केल्याचा आरोप राहुल यांनी केला. आम्ही द्वेषाचे राजकारण कधीही केले नाही. आम्ही फक्त प्रेमावरच विश्वास ठेवतो आणि त्यामुळेच आम्हाला विजय मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या निवडणुकीत द्वेषाच्या राजकारणाचा पराभव होईल आणि प्रेमाचा विजय होईल असे ते म्हणाले.
Congress President Rahul Gandhi after casting his vote: The election was fought on key issues including demonetization, farmer problems, Gabbar Singh Tax and corruption in #Rafale. Narendra Modi used hatred in the campaign and we used love and I am confident love will win pic.twitter.com/gE1BgvQzPc
— ANI (@ANI) May 12, 2019
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. राहुल गांधी यांनी औरंगजेब लेनमधील एन. पी. सिनिअर सेकंडरी शाळेच्या मतदान केंद्रात जाऊन मतदान केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी नरेंद्र मोदी द्वेषाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला. या निवडणुकीत बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्या, नोटाबंदीमुळे झालेले नुकसान, पाच वर्षाच्या भाजपच्या काळात झालेला भ्रष्टाचार आणि राफेल घोटाळा हे प्रमुख विषय असल्याचे त्यांनी सांगितले. हे मुद्दे काँग्रेसचे नाहीत. देशातील सर्वसामान्य जनतेचे हे मुद्दे आहेत, असेही ते म्हणाले. देशातील जनतेला भाजप सरकार आणि नरेंद्र मोदी यांच्याकडून या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत, असेही त्यांनी सांगितले.
या निवडणुकीत काँग्रेसला किती जागा मिळतील यावर थेट उत्तर देणे त्यांनी टाळले. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम काम केल्याचे ते म्हणाले. आता निवडणुकीचा अखेरचा टप्पा शिल्लक आहे. या निवडणुकीत प्रसारमाध्यमांनी योग्य भूमिका बजावल्याचे सांगून त्यांनी प्रसारमाध्यमांचे आभार व्यक्त केले.


























































