
>> शिबानी जोशी
उन्हाळय़ाच्या सुट्टीचा आत्मा म्हणजे खेळ. भलेही आज मुलांच्या हाती मोबाईल आला असला तरी या आपल्या पारंपरिक खेळांची त्यांना ओळख करून द्यायला हवी.
नुकतीच एका मैत्रिणीने ‘व्हॉटस् ऍप’ ग्रूपवर सागरगोटे खेळतानाची छोटी क्लिप पाठवली. वीस आणि पन्नाशी-साठीच्या तिच्या दोघी-तिघी मैत्रिणी सागरगोटे खेळत होत्या. पहिला एक सागरगोटा उचलायचा मग दोन -दोन उचलायचे नंतर एक उचलून तो हातावर पाठी पुढे टाकून खाली पडू न देता वर फेकलेला सागरगोटा हातात पकडायचा असे वेगवेगळे खेळ त्या खेळत होत्या व तिची नात शेजारी बसून हा खेळ पाहत होती. ती तिला खेळ शिकवत होती. हा व्हिडीओ पाहून खरं तर मी पण बालपणात पोहोचले. लहानपणाचे सर्व खेळ आठवायला लागले. पण मला जास्त गंमत वाटली की, ज्या नातीच्या वयातल्या मुलींनी हे खेळ खेळायला हवेत ती नुसती बसून आजीचा खेळ पाहातेय आणि आजी जुन्या आठवणींमध्ये रमण्याचा प्रयत्न करतेय. आजी तिला शिकण्यासाठीच ते खेळ खेळत होती, पण तिचं लक्ष मोबाईलमध्ये दिसत होते.
उन्हाळय़ाची सुट्टी सुरू झाली आहे. दीड-दोन महिने मिळणारी ही सुट्टी म्हणजे लहान मुलांसाठी चैनच असते म्हणजे निदान आपल्या वेळी तरी होती. आजकालच्या व्हर्च्युअल गेम्सच्या जमान्यात हातात बारा महिने मोबाईलवर खेळ असतील पण अंगणात, मैदानात खेळले जाणारे खेळ, दुपारी खेळले जाणारे बैठे खेळ यांची मजा आपल्या पिढीने अनुभवली, ती काही न्यारीच होती. सकाळी वेगळे खेळ, दुपारी बैठे खेळ, संध्याकाळी मैदानी खेळ व रात्रीसुद्धा परवचा झाली की वेगळे बैठे खेळ खेळले जात असत. मे महिन्यातल्या टळटळीत उन्हात वेगळे खेळ, जूनला पाऊस सुरू झाला की वेगळे खेळ खेळले जात असत. या खेळांचं वैशिष्टय़ म्हणजे प्रत्येक खेळातून अनेक प्रकारचं बाळकडू आपणहून मिळत असे, व्यायाम घडत असे. मेंदूला चालना मिळत असे, वेळ उत्तम जात असे. मित्र, बहीण-भावांतील नातं दृढ व्हायला मदत होत असे. सकाळी लवकर उठून स्विमिंगला जायचा कार्यक्रम ठरत असे.
आमच्याकडे एक खूप मोठी सार्वजनिक विहीर होती. तिथे ढकलून दिलं जाई आणि आपोआप पोहणं शिकलं जात असे. पोहून आलं की, जोरदार भूक लागलेली असे. नाश्ता झाला, आंघोळ झाली की अंगणात आबाधुबी, बॉल फेकाफेकी, ऊन की सावली, गाढवाला शेपूट लावणे, चमचा लिंबू असे खेळ सावली शोधत खेळले जात. पोटात कावळे कावकाव करायला लागले की जेवणाच्या वेळेची आठवण होत असे. पटापट जेवून एखाद्या मित्र-मैत्रिणीकडे किंवा बोळात, गॅलरीत पत्ते कुटणे, सापशिडी, लिडो व्यापार हे खेळ सुरू होत असत. ‘व्यापार’ या खेळात तर 2-3 तास कसे निघून जात कळत नसे. व्यापार खेळाचा पुठ्ठा समोर ठेवून भेंडी बाजार, चिराबाजार थेट विकत घेतले जायचे. एकेका रंगाची जास्तीत जास्त कार्ड यात जगवली पाहिजेत, असा रिवाज असायचा. आजच्या मुलांना हा खेळ माहीत असेल असं मला वाटत नाही, पण हा अतिशय इंटरेस्टिंग खेळ होता, यात वेळ कसा जायचा कळत नसे. एकाच पुठ्ठय़ावर पाठी सापशिडी व पुढे लिडो खेळ असायचे, त्यात पण तासन्तास जात असत. या सर्व खेळात डोक्याला चालना मिळत असे.
‘पिंकी पिंकी व्हॉट कलर’, रूमाल पळवणी, आंबा फोडणी, भातुकली, नेता ओळखणे, हंडा फोडणी असे कितीतरी खेळ दुपारच्या वेळात सावलीच्या जागेत पूर्वी खेळले जात असत. हे खेळ खेळताना आरडोओरडा, धावपळ ठरलेलीच. कानगोष्टी, चिठ्ठी शोध असे कमी आरडाओरड असलेले खेळ सुरू व्हायचे. तोपर्यंत चहाची वेळ व्हायची. चहा-बिस्कीटं काही तरी खाऊन झालं की चाललो मैदानी खेळ खेळायला. त्यामध्ये लंगडी, आंधळी कोशिंबिर, डोंगराला आग लागली पळा रे पळा, तळय़ात की मळय़ात, नदी का पहाड, लगोरी, ठिक्करपाणी साखळी, रस्सीखेच, लपाछपी, राम राम पाव्हणं, विटीदांडू, बेडूक उडय़ांची शर्यत, पावडय़ांचा खेळ असे कितीतरी खेळ खेळले जात असत. दोन गट करून केलेली रस्सीखेच आणि त्यात एका बाजूने ‘जोर लगाके’ खेचल्यावर दुसऱया बाजूचे गडी मातीत लोळल्यावर इतकी मजा येत असे की, तो आनंद मोजताच येणार नाही. विटीदांडू खेळताना विटी उडवत उडवत मुले दुसऱयाच्या ग्राऊंडवरसुद्धा पोचत असत आणि ओरडा खाऊन परत येत असत. ठिक्करपाणी हा खास मुलींचा खेळ होता. जमिनीवर पाच चौकोन दोन रांगात खडूनी गिरवायचे, त्यात ठिक्कर फेकायची व ती चौकोनाच्या बाहेर पाय न पाडता ठिक्कर घेऊन यायची. चौकोनाच्या बाहेर पाय पडला की आऊट मग दुसऱया मुलीला खेळायला मिळायचे. मुलींचे आणखी आवडते खेळ म्हणजे सागरगोटे, काचपाणी, भातुकली, गृहखाद्य रुमालावर एम्ब्रॉयडरी शिकणं असे असायचे. काचपाणीसाठी बिल्डिंगच्या अंगणात, आजूबाजूला फिरून काचेच्या बांगडय़ा गोळा केल्या जायच्या. त्या विविध रंगीत फुटलेल्या बांगडय़ांचे तुकडे करून एकत्र टाकले जायचे. फेकलेले तुकडे दुसऱया तुकडय़ाला स्पर्श न करता गोळा करायचे. दुसरा तुकडा हलला की आऊट झाली मग दुसऱया गडय़ाला संधी मिळायची. दिवाळीच्या सुट्टीत किल्ले करणे. हा एक एकत्रित खेळ खूपच लोकप्रिय होता. मातीचा किल्ला आधी बनवून घरून विविध फुकट गेलेले सामान आणून त्यावर मांडले जाई. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे, सैन्य, घोडे, हत्ती, सिंहासन, झाडं, फुले, असे काहीही कच्चा माल त्यासाठी वापरला जाई.
हल्ली पावसाळा लांबतो, परंतु 20-30 वर्षांपूर्वी साधारण जूनच्या सुरुवातीला पावसाला सुरुवात होत असे. जमीन, माती जी हल्ली शहरात पेवर ब्लॉक्समुळे कुठेच दिसत नाही ती छान ओली होत असे. त्याचा मृद्गंध मन पावसात जायला. भाग पाडत असे. कुठे छोटेसे डबकं जमत असे. कुठे थोडंबहुत पाणी दिसे मग त्यात शाळा सुरू होईपर्यंत वेगळे खेळ सुरू होत असत. अगदी होडय़ा करून सोडणे, ओल्या झालेल्या जमिनीत लोखंडी सळी खुपसणं, गोलगोल राणी इथं इथं पाणी. पहिल्या पावसात मनसोक्त भिजून दोन मोठी लाकडं आडवं टाकून सी सॉ खेळणे असे खेळ खेळून पावसाचं स्वागत केलं जाई. ‘शर्यत बेडूकउडय़ांची’ ओल्या मातीत ही शर्यत खेळली जायची.
रात्रीची जेवणं झाली तरीही काही तरी खेळ खेळण्यासाठी मित्र-मैत्रिणींना एकत्र जमण्याची इच्छा होत असे. मग पुन्हा एकमेकांना बोलावून बैठे आणि थोड डोकं लढवावं लागेल असे खेळ सुरू होत असत. त्यात पत्ते तर ठरलेलेच. पत्त्यातही लॅडीस, छब्बू, गड्डा छब्बू, गुलामचोर, पानचोर, बदाम सात असे विविध खेळ, खाणाखुणा करीत खेळण्यात खूप मजा. आणखी एक खेळ खूपच प्रसिद्ध होता. ‘नाव, गाव, फळ, फूल, वस्तू, प्राणी’ प्रत्येकानं कागद, पेन घेऊन बसायचं आणि एक अक्षर द्यायचं. ‘कानगोष्टी’ हा तर सगळीकडे खेळला जाणारा, सर्वमान्य खेळ रात्री चालायचा. हे सर्व खेळ खरं तर हल्लीच्या मुलांनी खेळले पाहिजेत. आजी म्हणत असे ‘पडी झडी तो वर चढी’. जुने, मातीतले खेळ बहुदा लोप पावलेत. मुलांची पावलं मातीला लागतच नाहीत. पटांगणही कमी झाल्येत म्हणा. आज हजारो रुपयांचे व्हिडिओ गेम्स, मोबाईल ही खेळणी झाल्येत पण पूर्वीचे हे बिनपैशाचे खेळ, उंच झोके याचे मोल अमूल्य आहे. आज चिखल मिळत नाही. म्हणून खास ‘मड पिरेड’ दिले जातात. मुलांना निसर्गाकडे वळवायची गरज आहे. या सुट्टीत आपल्या घरापासूनच सुरुवात करायला काय हरकत आहे? हे सर्व खेळ मुलांबरोबर बसून खेळायला काय हरकत आहे?




























































