भरधाव मोटारसायकलला टमटमने उडवले, चुमकलीसह आई-वडिलांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । वडवणी

वडवणी तालुक्यातील बावी तांडा येथे विवाहासाठी आलेले राठोड कुटुंब विवाह उरकून गावाकडे परतत असताना त्यांच्या मोटार सायकलला पाठीमागून आलेल्या टमटमने जोराची धडक दिली. या अपघातामध्ये नवरा-बायकोसह एक चिमुकली ठार झाली. तर चिमुकला मुलगा अपघातात आश्यर्यकारकरित्या बचावला.

वडवणी तालुक्यातील कुप्पा फाट्याजवळ असणाऱ्या बावी तांडा येथे विवाहासाठी आलेले परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील रेणापूर येथील राठोड कुटुंब विवाह उरकून दुपारी गावाकडे मोटारसायकलवर परत जात असताना कुप्पा फाट्याजवळ पाठीमागून आलेल्या भरधाव वेगातील टमटमने राठोड यांच्या मोटारसायकलला जोराजी धडक दिली. या अपघातामध्ये गणेश राठोड, लिलाबाई राठोड, आणि त्यांची चिमुकली रोशनी राठोड यांचा जागीच मृत्यू झाला. जोराची धडक बसल्यानंतर मोटारसायकल आणि राठोड कुटुंब रस्त्यावर फेकले गेले. रक्तामासांचा सडा पसरला गेला. त्यांना तातडीने जवळच्या कुप्पा प्राथमिक रूग्णालयामध्ये दाखल केले गेले. मात्र त्या तिघांचाही अपघातस्थळीच मृत्यू झाला होता.

देव तारी त्याला कोण मारी
राठोड कुटुंब आपल्या दोन चिमुकल्यासह लग्नाहून गावाकडे परतत होते. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी आणि त्यांचा लहान मुलगा सोबत होता. अपघात झाल्यानंतर नवरा बायकोसह चिमुकल्या मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर चिमुकला मुलगा अपघाताच्या घटनेने पंधरा ते वीस फुटावर फेकला गेला. तो माती पडल्यामुळे त्याला साधी जखमही झाली नाही. आश्यर्यकारकरित्या त्याचा जीव वाचला.