एसटीचा 71 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । अलिबाग

एसटीच्या लाल डब्ब्यात बदल झाला असून जुनी एसटी प्रवाशांच्या सेवेसाठी नव्या रुपात दाखल झाली आहे. याच एसटी बसचा आज 71 वा वर्धापन दिन राज्यात साजरा होत आहे. रायगड जिल्ह्यातही एसटी आगारात एसटीचा वर्धापन दिन केक कापून उत्साहात साजरा केला. अलिबाग आगरामार्फत एसटी बस वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी लोकप्रतिनिधी, कर्मचारी, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रायगड विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी एसटीबाबत आपली भावना भाषणातून व्यक्त केली. रायगड जिल्ह्यात आठ एसटी आगर असून साडे पाचशे बसेस प्रवाशांच्या सेवेत आहेत. एसटीचे 3 हजार कर्मचारी प्रवाशांच्या सेवेत कार्यरत आहेत. जिल्ह्यात वर्षाला दीड लाख प्रवासी एसटी बसने प्रवास करीत आहेत. जुन्या लाल डब्याने आता कात टाकली असून शिवनेरी, शिवशाही, हिरकणी, विठाई या आरामदायी, सुखकारक, वातानुकूलित बसेस प्रवाशांच्या सेवेत काही वर्षात दाखल झाल्या आहेत. अशी माहिती बारटक्के यांनी आपल्या भाषणातून दिली.

यावेळी रायगड एसटी कर्मचाऱ्यांनी बसचे उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही बारटक्के यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना केले. यावेळी गुणवंत कामगारांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मान्यवरानीही भाषणे केली. कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर एसटी कर्मचारी, अधिकारी यांनी प्रवाशांना गुलाब पुष्प व पेढे वाटले.