
सामना ऑनलाईन। कोची
जीवघेण्या निपाह व्हायरसने पुन्हा फणा काढला असून केरळमध्ये निपाहची लागण झाल्याच्या संशयावरून आतापर्यंत 86 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर यातील एका तेवीस वर्षीय तरुणाला निपाहची लागण झाल्याचे स्षष्ट झाले आहे. राज्याच्या आरोग्यमंत्री के के शैलजा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
तसेच राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने देखील या वृत्तास दुजोरा दिला असून एका 23 वर्षीय विद्यार्थ्याच्या रक्तात निपाहचे विषाणू आढळल्याचे म्हटले आहे. तसेच या वृत्ताने घाबरून जाण्याचे कारण नाही. कारण निपाहची लागण होण्याआधीच सरकारने आपल्या उपाययोजना सुरू केल्या आहेत, असेही संस्थेने सांगितले. त्याचबरोबर निपाहशी संबंधित उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी आरोग्य विभागाची बैठकही घेतल्याचे आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी म्हटले आहे.
तसेच राज्य सरकारच्या मदतीसाठी आरोग्य विभागातील तज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांचे एक पथक केरळमध्ये गेल्याचेही ते म्हणाले. आतापर्यंत निपाहची लागण झाल्याच्या संशयावरून 86 संशयित रुग्णांवर उपचार सुरू असून यातील एका तरुणाला निपाह झाल्याचे आढळले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्यासाठी आरोग्य विभागाने एक स्वतंत्र कक्षही उभारल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. दरम्यान, निपाहची लागण झालेला तरुण एर्नाकुलम जिल्ह्यातील आहे. काही दिवसांपूर्वी तो इतर 16 विद्यार्थ्यांबरोबर चारदिवसांसाठी त्रिशूर येथे गेला होता. पण तिथून आल्यानंतर त्याला ताप येऊ लागला. यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

























































