
सामना प्रतिनिधी । लातूर
उदगीर तालुक्यातील मादलापूर येथे शेतातून जाण्याच्या कारणावरुन झालेल्या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. त्यात दोन भावांना गंभीर दुखापत झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी शिवाजी नरसींग शिंदे आणि त्याच्या सोबत इतर दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी संगनमत करून तक्रारदार व त्याच्या भावाला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उदगीर ग्रामिण पोलीस ठाण्यात या मारहाण प्रकरणी विशाल बालाजी चव्हाण याने तक्रार दाखल केली. नेहमीच्या रस्त्याने न जाता शेतातून जात असताना तक्रारदाराने शिंदे यांच्यासह दोघांना रोखले आणि माझ्या शेतातून जाऊ नका असे सांगितले. त्यावेळी शिंदे यांच्यासह दोघांनी तक्ररदार व त्याचा भाऊ विनोद यांना शिवीगाळ करून दगडाने व लोखंडी रॉडने मारहाण केली. या मारहाणीत तक्रारदाराच्या पायाचे हाड मोडले तर त्यांच्या भावाच्या डोक्यात दगड मारल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. शिवाजी नरसींग शिंदेसह तिघांविरुध्द पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी बेंद्रे करीत आहेत.






























































