
सामना प्रतिनिधी । मुंबई
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने केलेल्या विनयभंगाच्या आरोपात कोणतेही तथ्य नसल्याचा दावा करत मुंबई पोलिसांनी आज नाना पाटेकर यांना या प्रकरणातून क्लीन चिट दिली.
पाटेकर यांनी तनुश्रीचा विनयभंग केल्याचा कोणताही पुरावा समोर आलेला नाही. त्यामुळे ही केसच बंद करण्यात यावी अशी विनंतीही पोलिसांनी न्यायालयास केली आहे. त्या संदर्भातल्या ‘बी’ समरी रिपोर्ट विक्रोळी पोलिसांनी अंधेरी येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयात दाखल केल्याची माहिती खुद्द पोलीस उपायुक्त परमवीरसिंह दाहिया यांनीच दिल्याने नाना पाटेकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान नाना पाटेकर यांनी सेटवरच आपला विनयभंग केल्याची तक्रार तनुश्री दत्ता हिने विक्रोळी पोलीस ठाण्यात दाखल केली होती.
भ्रष्ट माणसाला क्लीन चिट मिळते याचे दुःख होते
विक्रोळी पोलिसांनी आपल्या प्रकरणात जी भूमिका घेतली ती आपल्याला अपेक्षित होती. त्यामुळे मला कोणत्याही प्रकारचे आश्चर्य वाटलेले नाही. अथवा धक्काही बसलेला नाही. परंतु भ्रष्ट पोलीस यंत्रणा आणि न्याय व्यवस्थेकडून जास्त भ्रष्ट असलेल्या व्यक्तीला क्लीन चिट मिळते याचे जास्त वाईट वाटते या शब्दांत तनुश्री दत्ताने चीड व्यक्त केली.





























































