
सामना प्रतिनिधी । मुंबई
जोरदार पाऊस आणि गच्चीवर पाणी साचून इमारतींना निर्माण होणाऱया धोक्याच्या पार्श्वभूमीवर इमारतींच्या गच्चीवर शेड बांधण्यास पालिकेकडून परवानगी मिळणार आहे. यामुळे इमारतींचा टेरेस सुरक्षित राहण्यास मदत होणार असल्यामुळे रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पालिका हद्दीतील इमारतींच्या टेरेसवर भेगा पडल्याने गळतीचा त्रास रहिवाशांना सहन करावा लागतो. शिवाय टेरेसवर पाणी साचल्याने इमारतीचे छतही कमजोर होते. त्यामुळे दुर्घटना होऊन जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा इमारतींवरील गच्चीवर शेड उभारण्यासाठी पालिकेने रीतसर परवानगी द्यावी, अशी ठरावाची सूचना शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी सभागृहात मांडली होती. या सूचनेला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत पावसाळय़ासाठी गच्चीवर शेड उभारण्यास विकास नियंत्रण नियमावलीअंतर्गत परवानगी दिल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
हे उपायदेखील करा
इमारतींचे आयुष्य वाढवण्याच्या दृष्टीने स्ट्रक्चरल इंजिनीयरच्या देखरेखेखाली ठरावीक काळाने दुरुस्ती करणे आवश्यक आहे. भिंतीवर भेगा भरणे, पर्जन्य वाहिन्या बदलणे, रंगरंगोटी, गच्चीवरील पाण्याचा निचरा होण्यासाठी तत्काळ उपाययोजना आदी बाबींकडे सोसायटय़ा, रहिवाशांनी लक्ष देणे गरजेचे असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.






























































