
सामना प्रतिनिधी। मुंबई
राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त सापडला असून आज रविवारी सकाळी 11 वाजता राजभवनात नव्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडेल. राधाकृष्ण विखे-पाटील, आशीष शेलार, जयदत्त क्षीरसागर आणि तानाजी सावंत, अविनाश महातेकर यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाईल अशी चर्चा आहे. तर प्रकाश मेहता यांच्यासह विष्णू सावरा, राजकुमार बडोले, प्रवीण पोटे, दिलीप कांबळे हे पाच मंत्री डेंजर झोनमध्ये आहेत. रात्री उशिरापर्यंत कोण येणार, कोण जाणार याचीच चर्चा सुरू होती पण यादी काही जाहीर झाली नव्हती. नव्या मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री 10 वाजता ‘वर्षा’ निवासस्थानी बोलावल्याची बातमी फुटली आणि प्रसारमाध्यमांनी ‘वर्षा’बाहेर एकच गर्दी केली. मात्र मुख्यमंत्री मध्यरात्रीपर्यंत निवासस्थानी दाखल झाले नव्हते. त्यामुळे पत्रकारांना यादी काही मिळाली नाही, नुसती चर्चाच सुरू राहिली!
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पावसाळी अधिवेशनापूर्वी होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच जाहीर केले होते, पण मुहूर्त सापडत नव्हता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री उशिरा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट घेऊन मंत्रिमंडळ विस्ताराबात चर्चा केली. निती आयोगाच्या बैठकीनिमित्त शनिवारी दिल्लीत असलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा केल्यावर रविवारी सकाळी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे जाहीर केले.
आठवलेंकडून महातेकरांचे नाव
मंत्रिमंडळ विस्तारात रिपब्लिकन पक्षातर्फे एक नाव देण्याची सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्याला केल्यावर अविनाश महातेकर यांच्या नावाची शिफारस पाठवल्याची माहिती केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली. त्यामुळे महातेकर यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार हे निश्चित झाले आहे.
‘चर्चे’तील नावे
विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देऊन भाजपच्या गोटात सामील झालेल्या राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार आहे. त्याचबरोबर भाजपा मुंबई अध्यक्ष आशीष शेलार, अनिल बोंडे (अमरावती), अतुल सावे (संभाजीनगर), संजय (बाळा) भेगडे (मावळ), संजय कुटे (शेगाव), सुरेश खाडे (सांगली) प्रो. अशोक उईके (यवतमाळ) जयदत्त क्षीरसागर (बीड), तानाजी सावंत (यवतमाळ) यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाईल, अशी चर्चा आहे.
डच्चू मिळणार?
भ्रष्टाचाराचे आरोप आणि खराब कामगिरीचा ठपका ठेवत भाजपच्या पाच विद्यमान मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला जाणार असल्याची खात्रिलायक माहिती आहे. एमपी मिल एसआरए प्रकल्पावरून गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता अडचणीत आले आहेत. आदिवासी विभागातील घोटाळाप्रकरणी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा तसेच सुमार कामगिरी असणारे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे आणि प्रवीण पोटे-पाटील यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे.
































































