
सामना प्रतिनिधी । मुंबई
मी राज्याचा मंत्री विनोद तावडे बोलतोय. आम्ही घरोबा नावाची योजना सुरू केली आहे. त्या योजनेअंतर्गत महिलांना त्यांचा एक व्यवसाय करता येऊ शकेल. शिवाय तुमच्या नातेवाईकांना नोकरी मिळवून देतो, अशी बतावणी करून महिलांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार होणाऱ्या भामट्यासह त्याच्या सहकाऱ्याच्या शिवाजी पार्क पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
अभिजित सुर्वे (39) असे त्या भामटय़ाचे तर त्याच्याकडून सोने घेऊन ते विकण्याचे काम करणाऱयाचे नाव सिद्धेश मांजरे (31) असे असून दोघेही काळाचौकी येथे राहतात. अभिजित हा कोणत्याही महिलेला फोन करून मी मंत्री विनोद तावडे बोलतोय अशी ओळख सांगतो. आम्ही घरोबा योजना सुरू केली आहे. तुम्ही चार-पाच महिलांचा गट तयार करा. तसेच एकादी जागा शोधून द्या म्हणजे त्या योजनेतंर्गत तुम्हाला तेथे चांगला व्यवसाय सुरू करून देतो, असे सांगतो. अशाप्रकारे अंबरनाथ येथे राहणाऱया प्रियांका चिल्लाळ यांचे सोन्याचे मंगळसूत्र घेऊन तो पसार झाला होता.
याप्रकरणी प्रियांका यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. अभिजित विरोधात कुर्ला, काळाचौकी, सायबर पोलीस ठाणे येथेही गुन्हे दाखल आहेत.


























































