कुंडलिका नदीत बुडालेल्या मुंबईच्या तिन्ही पर्यटकांचे मृतदेह शोधण्यात यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । अलिबाग

कोलाड जवळच्‍या बल्‍हे गावातून वाहणाऱ्या कुंडलिका नदीत बुडून बेपत्‍ता झालेल्‍या तिसऱ्या पर्यटकांचा मृतदेह सोमवारी सकाळी पावणे अकरा वाजण्‍याच्‍या सुमारास राफटर्सच्‍या हाती लागला. रविवारी बुडालेल्‍या तिघांपैकी दोघांचे मृतदेह सायंकाळी हाती लागले होते.

रायगड जिल्‍हयातील कोलाड जवळ असलेल्‍या बल्‍हे गावात मुंबईच्‍या ट्रॉम्‍बे परीसरातील 28 तरूण सहलीसाठी आले होते. त्‍यातील काहीजण कुंडलिका नदीत पोहण्‍यासाठी उतरले. यापैकी तिघांचा बुडून दुर्दैवी अंत झाला. स्‍थानिकांनी त्‍यांना वाचवण्‍याचा असफल प्रयत्‍न केला. महेश जेजुरकर, परेश जेजुरकर या दोघा सख्‍या भावांसह अक्षय गणगे याचा त्‍यात समावेश आहे. पोलिसांनी राफटर्सच्‍या मदतीने रविवारी दुपारपासून शोधमोहीम हाती घेतली. रविवारी उशिरापर्यंत परेश व अक्षय या दोघांचे मृतदेह हाती लागले होते.

रविवारी काळोख झाल्‍यामुळे थांबवलेली शोधमोहीम सोमवारी सकाळी पुन्‍हा सुरू करण्‍यात आली. या मोहीमेत महेश जेजुरकर याचा मृतदेह हाती लागला. दुर्घटनेतील दुर्देवी तरूण परीसरातील सामाजिक कार्यात नेहमीच पुढे असत. त्‍यांच्‍या जाण्‍याने ट्रॉम्‍बे गावात हळहळ व्‍यक्‍त होत आहे. परेश व महेश जेजुरकर बंधू फुलांच्‍या सजावटीचा व्‍यवसाय करीत तर अक्षय आय टी कंपनीत कामाला होता. स्‍थानिक आमदार तुकाराम काते कालपासून बल्‍हे गावात ठाण मांडून सर्वतोपरी मदत करीत होते. कुंडलिका राफटर्सच्‍या टीमने मेहनत घेत मृतदेह शोधण्‍यात प्रमुख भूमिका बजावली त्‍यांना ग्रामस्‍थांची मोलाची मदत झाली.