बसपाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांनी चोपले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। अमरावती

बहुजन समाज पार्टीची सोमवारी अमरावतीच्या शासकीय विश्रामगृहात पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक सुरू होती. या बैठकीत महाराष्ट्राचे प्रभारी उपस्थित होते. बैठकीला सुरुवात होताच अमरावती जिह्यातील बसपाच्या कार्यकर्त्यांनी तिन्ही पदाधिकाऱयांना खुर्च्यांनी मारहाण केली. यामुळे घटनास्थळी काही काळ मोठा वादंग सुरू होता. या घटनेमुळे जिह्यात चांगलीच खळबळ उडाली असून बसपातील पक्षांतर्गत गटबाजी चव्हाटय़ावर आली आहे.

नुकतीच लोकसभेची निवडणूक आटोपली यात महाराष्ट्रात बसपाला एकही जागा मिळाली नाही. तर दर निवडणुकीत पक्ष तिकीट विकून पक्षाला दलाली करीत असून पदाधिकारी केवळ पैसे कमावून समाजाला विकत असल्याचा आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी केला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अमरावती जिह्यातील निवडणूकीचा आढावा घेण्यासाठी उत्तर प्रदेश येथून आलेले महाराष्ट्र प्रभारी प्रमोद रैना, संदीप ताजने व कृष्णा बैले उपस्थित होते. त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शनाला सुरुवात करताच स्थानिक कार्यकर्त्यांनी तुम्ही पक्षात दलाली करीत आहे. तुमच्यामुळे समाज बदनाम होत आहे. असे सांगून शासकीय विश्रामगृहात बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांनी खुर्चीने बदडले. कार्यकर्त्यांनी तिन्ही प्रभारींवर खुर्च्यांचा वर्षाव करत मारहाण केली. या तिन्ही पदाधिकाऱयांना सळो की पळो करून सोडले. यावेळी घटनास्थळी चांगलाच गोंधळ उडाला होता. महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष चेतन पवार व राजू बसवनाथे उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षात अंतर्गत गटबाजी चव्हाटय़ावर आली आहे.